बेळगाव लाईव्ह:हलगा (ता. जि. बेळगाव) येथील शेतामध्ये राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर लिमिटेड या कंपनीतर्फे शेतकऱ्यांसमोर आज शुक्रवारी सकाळी ड्रोनच्या माध्यमातून पिकावर नॅनो युरिया फवारणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
हलगा येथील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर लि.ने (आरसीएफएल) आज एक स्तुत्य उपक्रम राबवताना नॅनो युरिया तंत्रज्ञानाद्वारे ड्रोनच्या माध्यमातून हवेतून पिकावर औषध फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. आरसीएफएलचे तंत्रज्ञ व ड्रोन ऑपरेटर विनय पवार यांनी हे प्रात्यक्षिक सादर केले.
तसेच त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नॅनो युरिया तंत्रज्ञान कसे वापरले जाते? त्याचे महत्त्व आणि फायदे याबद्दल माहिती देण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. फवारणीसाठी आणलेल्या ड्रोन मशीनची किंमत सुमारे 10 लाख रुपये असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ड्रोनद्वारे औषध फवारणीच्या प्रात्यक्षिकाप्रसंगी कृषी अधिकारी सी. एस. नायक, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक विनायक, हलगा गावातील ग्रामसेवक आणि शेतकरी उपस्थित होते.
ड्रोन फवारणी संदर्भात बेळगाव लाईव्हला माहिती देताना राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर लिमिटेडचे ड्रोन ऑपरेटर विनय पवार म्हणाले की, नॅनो युरिया तंत्रज्ञानाद्वारे ड्रोनच्या माध्यमातून हवेतून पिकावर औषधाची फवारणी केली जाते. युरिया म्हणजे पिकाच्या पानांवर पडणे.
जेंव्हा ड्रोनने फवारणी केलेले औषध पिकाच्या पानांवर पडते तेंव्हा त्याची परिणाम उत्तम मिळतात. ड्रोन एकदा चार्ज केल्यानंतर तो 708 मिनिट चालतो. या कालावधीमध्ये एक ते दीड एकर पिकांवर फवारणी केली जाऊ शकते. ड्रोनद्वारे फवारणीचे परिणाम चांगले दिसून आले आहेत. शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण यामुळे शेतमजुरीच्या पैशाची आणि वेळेची मोठी बचत होते.
विमानतळापासून 3 ते 5 कि.मी. अंतरावरील हरित पट्ट्यात आम्ही या ड्रोनचा वापर करू शकतो. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राबवत असलेल्या भारत अभियानामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळत आहे. त्या अंतर्गत महिलांना रिमोट पायलट प्रशिक्षण घेण्यास सांगितले जात आहे. हे प्रशिक्षण देण्यास त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाबाबत माहिती देण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत.
कारण भविष्यात कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान अत्यंत पुढे जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे ते भाड्याने ड्रोन तंत्रज्ञान वापरू शकतात. हे तंत्रज्ञान वापराचे भाडे कंपनीनुसार वेगवेगळे असू शकते. सध्या हे भाडे साधारण 300 रुपयांपासून 700 रुपयांपर्यंत आहे, असे पवार यांनी शेवटी सांगितले.