Friday, January 3, 2025

/

बेकायदा लाटलेल्या आमच्या जमिनी परत करा -मरणहोळ ग्रामस्थांची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील मरणहोळ गावातील आमच्या वडिलोपार्जित जमिनी बेकायदेशीररित्या बळकवण्यात आल्या असून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि आमच्या जमिनी आम्हाला परत मिळवून द्याव्यात, अशी मागणी मरणहोळ ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी मरणहोळ ग्रामस्थांनी केआरएस पार्टीच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी बेळगाव सुवर्ण विधानसौध येथील आंदोलन स्थळी धरणे सत्याग्रह करून निवेदन सादर केले. मरणहोळ हे महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवरील टोकाचे गाव असून येथील गावकरी मराठी भाषिक आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसापासून तब्बल 70 कि.मी. अंतराचा पायी प्रवास करत पदयात्रेने हे गावकरी बेळगावला आले आहेत.

आपल्या मागणी संदर्भात मरणहोळचे लक्ष्मण शट्टू चमेटकर यांनी बेळगाव लाईव्हला दिलेल्या माहितीनुसार, मरणहोळ गावामध्ये 1400 एकर जमिनीमध्ये घोटाळा झाला आहे. गेल्या 1930 पासून या इनाम जमिनी तेथील शेतकरी कसत आहेत. मात्र गावासाठी राखीव ठेवलेल्या या इनामी जमिनीवर कांही धनदांडग्या लोकांची नावे चढवण्यात आली आहेत.

हे बेकायदेशीर कृत्य महसूल खात्यातील कांही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून करण्यात आले आहे. मरणहोळ येथील शेतकरी जवळपास 100 वर्षांपासून कसत असलेल्या या जमिनींची मूळ सरकारी कागदपत्रे गहाळ करून संबंधित अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटी बाहेर जात बनावट कागदपत्रांद्वारे जमिनी हडपण्याचा प्रयत्न केला आहे.Marnhol villagers

मरणहोळ गावातील सर्वे क्र. 24, 25, 33 व 34 मधील जमीन हडपण्याचा प्रकार झाला असून त्यामुळे त्या इनामी जमिनी ज्यांच्या नावावर आहेत त्या सुमारे 200 कुटुंबांवर अन्याय झाला आहे, त्यांच्यावर भूमीहीन होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपली हक्काची जमीन आपल्याला परत मिळावी, ती आपल्या नावावर केली जावी, अशी मरणहोळ ग्रामस्थांची मागणी आहे.

मरणहोळ ग्रामस्थांच्या आजच्या आंदोलनामध्ये लक्ष्मण चमेटकर यांच्यासह हालप्पा पाटील, भरमा पाटील, बाळू पाटील, बयाप्पा पाटील, प्रकाश पाटील ज्योतिबा दड्डीकर, भरमा कडालकर आदींसह बहुसंख्य गावकऱ्यांचा सहभाग होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.