बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कंग्राळ गल्ली येथील ड्रेनेजच्या चेंबरमध्ये सुमारे तीन-चार महिन्याचे मृत अर्भक दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तथापी आज दिवसभर शोध घेऊनही ते अर्भक सापडू शकले नाही.
कंग्राळ गल्ली येथील तुंबलेल्या ड्रेनेज पाईपलाईनची साफसफाई करण्यास गेलेल्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना चेंबरमध्ये एक मृत अर्भक आढळून आले आहे. याबाबतची माहिती मिळताच प्रभागाचे नगरसेवक शंकर पाटील आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
सफाई कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार ड्रेनेजची स्वच्छता करताना त्यांना त्यात मृत अर्भक आढळून आले आहे. त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे नगरसेवक शंकर पाटील यांच्या उपस्थितीत पाण्याचा फवारा वगैरे मारून आज दिवसभर त्या अर्भकाच्या कलेवराचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते.
या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना नगरसेवक शंकर पाटील यांनी सांगितले की, परवा माझ्याकडे या ठिकाणची ड्रेनेज लाईन तुंबल्याची तक्रार आली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन गेल्या शनिवारी सफाई कर्मचाऱ्यांना या ठिकाणी ड्रेनेजच्या साफसफाईसाठी पाठवले होते. त्यावेळी पाण्याचा फवारा मारून साफसफाई करताना त्यांना ड्रेनेजमध्ये एक मृत अर्भक ओझरते आढळून आले होते. मात्र पाण्याचा मोठा फवारा मारून ड्रेनेज लाईन स्वच्छ केली जात असल्यामुळे ते अर्भक पाण्याच्या लोटा बरोबर पुढे पाईपमध्ये पुढे जाऊन अडकून बसले. त्यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले नाही.
आज पुन्हा या ठिकाणची ड्रेनेज तुंबण्याची समस्या उद्भवल्याने त्या सफाई कामगारांकडे विचारणा केली असता त्यांनी ड्रेनेजमध्ये अर्भक पाहिल्याची माहिती दिली. त्यानुसार ड्रेनेजमध्ये आढळलेले मृत अर्भक सुमारे 3-4 महिन्याचे असावे. सदर प्रकाराची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आली असून या संदर्भात पुढील कार्यवाही त्यांच्याकडून केली जाईल, असे नगरसेवक पाटील यांनी सांगितले.
कंग्राळ गल्ली सारख्या शहराच्या भरवस्तीतील रस्त्याच्या ठिकाणी सदर घटना उघडकीस आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे या भागात कांही पीजी अर्थात लेडीज पेइंग गेस्ट हाऊस असून तेथे अनेक मुलींचे वास्तव्य आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना देखील ऊत आला आहे. दरम्यान या संदर्भात सायंकाळी बेळगाव लाईव्हने नगरसेवक शंकर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ड्रेनेज मधील ते मृत अर्भक सापडले नसल्याचे स्पष्ट केले.
तसेच इतके दिवस पाण्यात राहिल्यामुळे कुजून विघटन झालेले अर्भकाचे कलेवर ड्रेनेज स्वच्छतेसाठी मारलेल्या पाण्याच्या फवाऱ्यासोबत नष्ट झाले असावे असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.