बेळगाव लाईव्ह:राज्यात सध्या कोरोना विषाणूची भीती वाढली असून राज्याच्या केरळ सीमेलगतच्या भागांसह राज्यातील कांही जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे.
सध्या चामराजनगर येथे 64 वर्षी वृद्धाचा खाजगी इस्पितळात मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली.
राज्यात काल कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एका 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात केंद्रीय आरोग्य खात्याने माहिती घेतली आहे. देशामध्ये कोरोनाच्या 20 जेएन.1 विषाणूची प्रकरणे वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे अशी माहिती मंत्री गुंडूराव यांनी दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकत्याच घेतलेल्या देशातील सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीस मंत्री दिनेश गुंडूराव हे उपस्थित होते.
दरम्यान कोरोना संदर्भात केल्या गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तांत्रिक सल्लागार समितीची बैठक घेतली. त्या बैठकीत कोरोनाशी संबंधित बऱ्याच विषयांवर चर्चा झाल्याचे गुंडुराव यांनी सांगितले. मागील वेळी शेकडा 90 टक्के लोक होम कॉरंटाईन होते. हे लक्षात घेऊन टेस्टिंग किट, मास्क, औषध वितरण वगैरेंची सर्व सिद्धता करण्यात आली आहे.
कोरोना उपचारासंदर्भात खाजगी हॉस्पिटल्सचे दर ठरवण्यासाठी उद्याच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आरटीपीसीआर चांचणीच्या दरासंदर्भात चर्चा केली जाईल.
सध्या सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये आरटीपीसीआर चांचणीचे दर उचित आहेत. राज्यामध्ये सध्या दररोज 5000 चांचण्या केल्या जात आहेत, अशी माहितीही आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली.
बस मध्ये मास्क अनिवार्य: परिवहन मंत्री
राज्यात कोरोनाची भीती वाढली असल्याने परिवाहन महामंडळाच्या बस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्क अनिवार्य करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांनी दिली आहे. कोविडची भीती लक्षात घेता मास्क बंधनकारक असून संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घेऊन आम्ही घेऊन याचे पालन करू असे त्यांनी म्हटले आहे.