बेळगाव लाईव्ह:बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सध्या सातजण इच्छूक आहेत. आणखी इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे सर्व इच्छुकांनी या सर्वांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्याकडे अर्ज केले आहेत.
उमेदवारीसाठी अर्ज स्वीकारण्याचा बुधवारी (दि. २०) शेवटचा दिवस आहे. तोपर्यंत आणखी कितीजण अर्ज करतात याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह अमरसिंह पाटील, राजदी कौजलगी, किरण साधुण्णावर, अशोक पुजारी, प्रेमा चिकोडी, कल्पना जोशी यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी अशी इच्छा अर्जाद्वारे केली
आहे. परंतु, आतापर्यंत अर्ज केलेल्यांची नावे बेळगाव मतदारसंघात चर्चेत नव्हती. ज्यांची नावे चर्चेत होती. त्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही. आता अर्ज करण्यासाठी दोनच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे, अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेण्याचा चंग काँग्रेसने बांधला आहे. त्यामुळे, उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी ११ रोजी झालेल्या बैठकीत इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्याने सर्वांचा विश्वास आणि इच्छाशक्ती वाढली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर विजय संपादन करण्यासाठी प्रभावी उमेदवारांना रिंगणात उतरविले जाणार आहे.
आणखी दोन दिवस इच्छुकांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर स्थानिक पातळीवर अर्जाचा विचार करुन त्यापैकीतिघांची अर्ज हायकमांडकडे पाठविली जाणार आहेत. त्यामधील एकाची निवड हायकमांडकडून केली जाणार आहे. मागील लोकसभा पोट निवडणूकित केवळ चार हजार मतांच्या फरकाने काँग्रेसचा पराभव झाला होता तर मागील विधान सभेत जिल्ह्यात काँग्रेसचा टक्का आणि जागा वाढल्या होत्या त्यामुळे काँग्रेस सध्या जिंकण्याच्या तयारी कडे लागले आहे.
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे. रोज दिवसभर काँग्रेस कार्यालयात गर्दी पाहायला मिळत आहे. बेळगावात उमेदवारीसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर चिकोडी आणि कारवार लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज स्वीकारले जाण्याची शक्यता आहे.