बेळगाव लाईव्ह :बेळगावजवळच्या गावात महिलेला विवस्त्र करून झालेल्या मारहाणीचे प्रकरण सीआयडीकडे सोपवले गेल्यानंतर सीआयडीच्या पोलिस उपमहानिरीक्षकांसह सहा जणांच्या पथकाने सोमवारी पीडित महिलेची भेट घेतली. या पथकाला पीडितेने आपली करुण कहाणी ऐकवली. पोलिसांनी ही कहाणी जबानी म्हणून नोंदवली आहे. मंगळवारी (आज) हे पथक महिलेच्या गावाला भेट देऊन अधिक माहिती जमवणार आहे. दरम्यान, ही घटना घडत असताना बघे बनून निष्क्रिय राहिलेल्या गावकऱ्यांवरही गुन्हा नोंदवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यांना शिक्षा व्हावी किंवा दंड करून ती भरपाई पीडितेला दिली जावी, असे मतही उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
बेळगावनजीकच्या एका गावात झालेल्या महिला अवमान प्रकरणी उच्च न्यायालयाने सोमवारी सुनावणी करताना केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. महिलेचा अवमान होत असताना केवळ बघे बनलेल्यांना दंड ठोठावण्याची सूचना न्यायालयाने दिली.
मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील द्विसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणी स्वयंप्रेरित सुनावणी सुरू केली आहे. सोमवारी न्यायालयाने पुन्हा एकदा सुनावणी केली. ब्रिटिश सत्ताकाळात विलियम बॅटिंग याने चोर राहणाऱ्या गावांवर विशिष्ट कर लागू केला होता. त्याच पद्धतीचा कर अशी बघ्यांची भूमिका घेणाऱ्यांवर लागू करता येईल का? असा प्रश्न उपस्थित केला. महिलेचा अवमान होत असताना केवळ मूक प्रेक्षक बनणे हे सहन करणे अशक्य असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.
सीआयडी पथकाकडून जबानी
बेळगावजवळच्या गावात महिलेचा झालेला अवमान राष्ट्रीय मुद्दा बनला असून, राष्ट्रीय मानव हक्क आयोगाने कर्नाटक सरकारला शनिवारी नोटिस बजावली. त्यामुळे सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा आदेश जारी केला. त्यानुसार पोलिस महासंचालक डॉ. अलोक मोहन यांनी तातडीने पथक स्थापन करून बेळगावला जाण्याची सूचना केली. तातडीने सहा जणांचे पथक रविवारी रात्री बेळगावात दाखल झाले आहे. पथकाचे नेतृत्व पूर्वी बेळगावचे जिल्हा पोलिस प्रमुख व सध्या सीआयडीचे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुधीरकुमार रेड्डी यांच्याकडे आहे. पथकात सीआयडीचे एसपी पृथ्वीक, एसपी रश्मी परड्डी, उपअधीक्षक अंजुमल नायक यांच्यासह अन्य
अधिकारी आहेत. पथकात एकूण तीन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
रविवारी रात्री उशिरा पथक बेळगावात दाखल झाले. सोमवारी पथकाने सदर महिलेची हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन तिची जबानी नोंदवली. जबानीचे रेकॉर्डिंगही केले. उद्या हे पथक त्या महिलेच्या गावी जाऊन जाऊन माहिती घेणार आहे. यानंतर अहवाल तयार करण्यात येणार आहे.
डीआयजी रेड्डी सोमवारी दिवसभर पथकासमवेत होते. सोमवारी सायंकाळी ते बंगळूरला रवाना झाले. उर्वरित पथक बेळगावातच राहणार असून उद्यापासून ते या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करणार आहे. या प्रकरणात ११ जणांना अटक झाली आहे.