बेळगाव लाईव्ह :सर्वसामान्यांकडून किमान बेळगावमध्ये तरी पोलिसांना नेहमीच नावे ठेवली जातात. तथापि कांही पोलीस असे आहेत की जे गरजूंना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात, त्यांच्यापैकीच एक आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी रवींद्र गडादी. डीसीआरई बेळगावचे एसपी असणाऱ्या गडादी यांच्या सहकार्यामुळे फेसबुक फ्रेंड्स सर्कलला आज एका बालकाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी तातडीने रक्त उपलब्ध करणे शक्य झाले आहे.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की आज मंगळवारी पहाटे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे (एफएफसी) प्रमुख संतोष दरेकर यांना एका महिलेचा फोन आला सुवर्णा माळगी नामक त्या महिलेने गेल्या सात डिसेंबर रोजी केएलई हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या आपल्या बालकावरील हृदय शस्त्रक्रियेसाठी तातडीने बी -निगेटिव्ह रक्ताची गरज असल्याचे सांगून मदतीची विनंती केली. तेव्हा दरेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने धावपळ करून अवघ्या अर्ध्या तासात रक्त उपलब्ध करून दिले.
मात्र यासाठी त्यांना डीसीआरई बेळगावचे एसपी रवींद्र गडादी यांचे मोठे सहकार्य लाभले. बालकाच्या शस्त्रक्रियेसाठी रक्त उपलब्ध करून देण्याकरिता गडादी यांनी स्वतःची कारगाडी देऊ केली. ज्यामुळे मृत्युंजयनगर बेळगाव येथील बी -निगेटिव्ह रक्तदाता गणेश प्रभू आणि कुट्टलवाडी गावातील रक्तदाता जोतिबा मुनाप्पा कनिजी यांना कार मधून अवघ्या अर्ध्या तासात हॉस्पिटलकडे नेता आले.
हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनीही तत्परता दाखवल्यामुळे गणेश व जोतिबा यांनी रक्तदान करून त्या बालकांसाठी वेळेत रक्त उपलब्ध करून दिले. मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव जिल्ह्यातील यद्दलगुड्डा गावचे रहिवासी असलेल्या सुवर्णा आणि संतोष माळगी यांच्या 14 दिवसांच्या बालकाचे योग्य जागी नसलेले हृदय नैसर्गिक मूळ जागी बसविण्यासाठी आज दुपारी शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
दरम्यान सदर बालकाचा जीव वाचविण्यासाठी रक्त उपलब्ध करून देण्यास सहकार्य केल्याबद्दल फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर व पद्मप्रसाद हुली यांनी केएलई हॉस्पिटलचे डॉक्टर्स, रक्तदाते आणि स्वतःचे वाहन देणारे पोलीस अधिकारी रवींद्र गडादी यांचे आभार मानले आहेत.