बेळगाव लाईव्ह :श्री राम सेना हिंदुस्थान या संघटनेच्यावतीने कै. अभिषेक पुजारी यांच्या स्मरणार्थ उद्या शुक्रवार दि. 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सदर रक्तदान शिबिर राजहंस गल्ली, अनगोळ येथील सदगुरू सदानंद महाराजमठ येथे होणार आहे. शहापूर येथील श्रीराम सेना हिंदुस्थानचा खंदा कार्यकर्ता, सच्चा शिवभक्त अभिषेक पुजारी यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. श्रीराम सेना हिंदुस्तानचा सच्चा कार्यकर्ता हरपल्यामुळे त्याच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय श्रीराम सेनेने घेतलाआहे.
त्यानुसार अभिषेक याच्या अकराव्या दिवशी म्हणजे उद्या शुक्रवार दि. 29 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम सेना हिंदुस्तान ही संघटना सामाजिक बांधिलकी जपण्यात नेहमीच आघाडीवर असते.
त्या अनुषंगाने त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. कोरोना प्रादुर्भाव काळात त्यांनी भरीव उल्लेखनीय कार्य केले आहे. मागील वर्षी महारक्तदान शिबिर आयोजित करून एका दिवसात तब्बल पाचशे हून अधिक युनिट इतक्या रक्ताचे संकलन करण्याचा विक्रम त्यांनी केला होता.
याखेरीज डेंगू, चिकनगुनिया लसीकरणासारखे स्तुत्य उपक्रम राबविणाऱ्या श्रीराम सेना हिंदुस्तान अनगोळतर्फे आता उद्या भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी या शिबीरात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री राम सेना हिंदुस्थान अनगोळचे उमेश (पप्पू) कुऱ्याळकर यांनी केले आहे.
राम सेना हिंदुस्तानचे अनगोळ विभागाचे प्रमुख उमेश कुऱ्याळकर यांनी यावर्षी कै. अभिषेक यांना श्रद्धांजली देण्याच्या हेतूने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. श्रीराम सेना संघटनेत शिव कार्यात झोकून दिलेल्या कार्यकर्त्याला श्रद्धांजली म्हणून रक्तदान शिबिरात सहभागी होऊन सामाजिक योगदान देण्यात यावे असे आवाहन कुऱ्याळकर यांनी केले आहे.