बेळगाव लाईव्ह :जगभराप्रमाणे आज 25 डिसेंबर रोजी बेळगाव शहर आणि उपनगरांसह ग्रामीण भागातील ख्रिश्चन बांधवांतर्फे ख्रिसमस सण धार्मिकतेने मोठ्या हर्षोउल्हासात साजरा केला जात आहे.
बेळगाव शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातील सर्व ख्रिश्चन बांधवांनी काल मध्यरात्री 12 वाजता येशू जन्मोत्सव मोठ्या आनंदी वातावरणात साजरा केला. त्यानंतर मध्यरात्रीपासून मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात येत आहे.
ख्रिसमस निमित्त बेळगावसह जगभरातील विविध चर्चमध्ये संपूर्ण प्राणीमात्राच्या अर्थात जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. ख्रिसमसच्या कालच्या पूर्वसंध्येपासून शहरातील विविध ठिकाणच्या चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी चर्च परिसर झगमगून उठण्याबरोबरच चर्चची वास्तू साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
. त्याचप्रमाणे ख्रिसमस निमित्त ठीक ठिकाणी येशू जन्माचे देखावे सादर करण्यात आले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करताना ख्रिस्ती धर्मगुरूंनी चर्चमध्ये विशेष प्रार्थना करून प्रभू येशूबद्दल माहिती दिली. तसेच येशूने दिलेल्या संदेशाचे जीवनात पालन करण्याचे आवाहन केले.
बेळगाव ख्रिश्चन धर्म प्रांताचे मुख्यालय असलेल्या कॅम्प येथील फातिमा कॅथेड्रल चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी ख्रिश्चन बंधू-भगिनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव धर्मप्रांताचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी उपस्थितांना संबोधित करून सर्वांना ख्रिसमस सणाच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील सेंट ऍंथोनी चर्च, मेथॉडिस्ट चर्च, इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च (आयसी चर्च), डिव्हाइड मर्सी चर्च, बेळगाव चर्च, सेंट्रल मेथोडेस्ट चर्च, माउंट कार्मेल चर्च, सेंट सॅबॅस्टीन चर्च वगैरे चर्चेमध्ये काल मध्यरात्री ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या संख्येने जमून प्रभू येशूची प्रार्थना केली.
त्याचप्रमाणे कॅरोल्स गायन केले. मेथोडेस्ट चर्चच्या धर्मगुरूंनी देखील बेळगावच्या जनतेला ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. एकंदर बेळगाव शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागातील ख्रिश्चन बांधव आज दिवसभर एकमेकांना शुभेच्छा देण्याबरोबरच गोरगरीब, दिन दलितांना मदत तसेच मिठाईचे वाटप करण्याद्वारे ख्रिसमस सण उत्साहात साजरा करत आहेत.