बेळगाव लाईव्ह :सांबरा, बेळगाव येथील भारतीय हवाई दलाच्या एअरमन ट्रेनिंग स्कूल (एटीएस) येथे 24 महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या दुसऱ्या तुकडीतील हाउसकीपिंग आणि आदरातिथ्य शाखेच्या 218 बिगर लढाऊ अग्नीविरांचा दीक्षांत सोहळा आज शनिवारी सकाळी दिमाखात पार पडला.
सांबरा येथील एटीएसच्या प्रशस्त परेड मैदानावर आयोजित आजच्या दीक्षांत सोहळ्यास आढावा अधिकारी (आरओ) अर्थात प्रमुख पाहुणे म्हणून एटीएस बेळगावचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. श्रीधर उपस्थित होते.
प्रारंभी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्नीविरांनी वाद्यवृंदाच्या तालावर शिस्तबद्ध संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर प्रशिक्षण कालावधी अप्रतिम सादरीकरण केलेल्या अग्नीवीरांना पाहुण्यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात एअर कमांडर एस. श्रीधर यांनी प्रथम प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सर्व अग्नीविरांचे अभिनंदन केले. तसेच सोपविलेली कामगिरी यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आपले ज्ञान आणि कौशल्य सातत्याने अधिकाधिक वाढवावे.
त्याचप्रमाणे सेवा काळात प्रत्येकाने स्वतःचे आचरण इतरांसाठी अनुकरणीय राहील याची काळजी घ्यावी असे आवाहन एअर कमोडोर श्रीधर यांनी केले. आजच्या दीक्षांत सोहळ्यातील सर्व प्रशिक्षणार्थींना अग्निपथ योजनेअंतर्गत गेल्या 30 जून 2023 रोजी भारतीय हवाई दलात भरती करून घेण्यात आले होते.