बेळगाव लाईव्ह: मुस्लिम बांधवात अजमेर यात्रेला खूप महत्व आहे देशातून अनेक जन या धार्मिक यात्रेला जात असतात. अजमेर वही जाते है जिन्हे ख्वाजा बुलाते हैं| ही म्हण देखील खूप प्रचलित आहे तेच पूर्ण करण्यासाठी बेळगावातील दोघा युवकांनी चालत प्रवास सुरू केला आहे.
बेळगावचे गौस मकानदार आणि मलिक कदम हे दोन युवक तब्बल 1400 कि.मी. पायी प्रवास करत अजमेर (राजस्थान) येथील दर्ग्याला भेट देण्यासाठी निघाले आहेत. न्यू गांधीनगर येथून आज अजमेरच्या दिशेने निघालेल्या या युवकांची श्रद्धा आजच्या युवा पिढीसाठी आदर्शवत, तर मुस्लिम समाजासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
आजकाल मोबाईलच्या विळख्यात अडकून तसेच व्यसनाच्या आहारी जाऊन आरोग्याकडे दुर्लक्ष केलेल्या आजच्या युवापिढीसाठी न्यू गांधीनगर येथील गौस मकानदार आणि मलिक हे दोघे एक आदर्श ठरले आहेत. श्रद्धे बरोबरच शारीरिक दृष्टिकोनातून या युवकांचा अजमेरला पायी चालत जाण्याचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.
धार्मिकतेचा हात धरुन आरोग्याची मौल्यवान संपत्ती जपण्याचा हा आगळा संदेश काळाची गरज बनला आहे. गौस मकानदार आणि मलिक कदम हे दोघे युवक आज न्यू गांधीनगर येथून पायी चालत अजमेर, राजस्थानच्या दिशेने रवाना झाले आहेत. बेळगाव ते अजमेर हा सुमारे 1400 कि.मी. अंतराचा त्यांचा प्रवास 45 दिवसांचा असून ते रोज 30 कि. मी. चालणार आहेत.
अजमेर येथील ख्वाजा गरिबन नवाझ या सुफी संतांच्या दर्ग्याला भेट घेण्याचे आमचे स्वप्न आम्ही लवकरच साकार करू, असा विश्वास मकानदार व कदम यांनी प्रवासाला निघण्यापूर्वी व्यक्त केला आहे.
या दोघांना नगरसेवक अजीम पटवेगार यांनी पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सदाम होसकोटी, आरीफ बाळेकुंद्री, तजमूल बक्षी, तबरेज जमादार आदींसह गांधीनगर येथील मुस्लिम जमात बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.