बेळगाव लाईव्ह :काँग्रेस पक्षाकडून बेळगावमध्ये लिंगायत आणि चिक्कोडीतून धनगर समाजाच्या उमेदवाराला लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
शहरातील काँग्रेस भवन येथे आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत चिक्कोडी आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. लोकसभेचे उमेदवार कोण असतील यावर अद्याप निर्णय झालेला नाही. पक्षाची बैठक घेऊन त्यावर निर्णय होणार आहे. यासंदर्भात जनता आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर सतत संपर्क ठेवला जात आहे.
माजी आमदार आमदारांना विश्वासात घेऊन हाय कमांडच्या ग्रीन सिग्नलवर उमेदवार ठरवला जाईल असे मंत्री जारकिहोळी यांनी पुढे नमूद केले. चिक्कोडी आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघात लिंगायत आणि धनगर समाजामध्ये लोकप्रिय असणाऱ्या तसेच जनतेत सतत संपर्कात असणाऱ्या पक्षातील वजनदार इच्छुकाला उमेदवारी देण्याबाबत गंभीरपणे विचार सुरू आहे.
हाय कमांडने अद्याप कोणत्याही मंत्र्याला लोकसभा निवडणूक लढवावी की नाही? याबद्दल सूचना केलेली नाही. त्यामुळे मी निवडणूक लढवणार की नाही हे नंतर ठरेल, असे ते म्हणाले.
राज्यात भाजपचे नेते विरोधी पक्षात आहेत आणि विरोधी पक्षाचे काम आरोप करणे हे असते. दुसरीकडे आमच्या सरकारच्या गॅरंटी योजनेवर आम्हाला विश्वास आहे आणि ते जनतेला माहित आहे. भाजपाचे नेते मात्र उगाच बिन बुडाचे आरोप करत आहेत असे त्यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्याला केंद्र सरकारकडून 410 कोटी रुपये अनुदान येणे बाकी आहे. तो निधी आल्यावर जनहितार्थ अनेक योजना कार्यान्वित करण्यात येतील असे सांगत त्यांनी बेळगाव जिल्ह्यातील कायदा आहे आणि सुव्यवस्था बिघडण्यासाठी अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढलेला आहे. यावर मी अधिकाऱ्यांची चर्चा करणार असल्याचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, माजी आमदार वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील आदी उपस्थित होते.