बेळगाव लाईव्ह : केपीसीसीचे कार्याध्यक्षपद अंजली निंबाळकर यांना दिले तर बरे होईल बेळगाव भागातील त्या सक्रिय महिला नेत्या आहेत यामध्ये मराठा समाजाला आकर्षण करणे वगैरे काही नाही, पण ते सगळे हायकमांडवर अवलंबून आहे असे मत बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
बेळगावात शनिवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, काँग्रेस नेत्यांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने जवळपास 10 वर्षांपासून कौटुंबिक राजकारण केले आहे. सत्तेत असलेल्या आमदार आणि मंत्र्यांच्या कुटुंबियांना खासदार, विधान परिषद सदस्य केले आहे. केवळ येडियुरप्पांचा मुलगा आहे म्हणजे झाले, सगळे काही येते असे नव्हे, त्यांना अजून बरेचसे काही शिकायचे आहे. पक्षाने त्यांच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक आहे. विजयेंद्र भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्याने आमच्या पक्षाला कोणतीही अडचण नाही.
सी. टी. रवी, श्रीरामुलू हे भाजप प्रदेशाध्यक्षपदाचे इच्छुक होते याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना, मंत्री जारकीहोळी म्हणाले की, प्रत्येक पक्षात दोन-तीन गट असतातच. एकाला खुश केले की दुसरे दोन गट नाराज होतात. सर्वच पक्षात असंतोष असतो. त्यांचा मुकाबला विजयेंद्र यांना करता आला पाहिजे. येडियुरप्पा यांना पक्षात ठेवून घेणे भाजपला अपरिहार्य आहे. त्यामुळेच त्यांच्या मुलाची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. यापूर्वी येडियुरप्पा यांना पक्षातून काढून टाकल्यामुळेच लोकांनी भाजपचा लाजिरवाणा पराभव केला आहे. आम्ही २-३ वेळा सांगितले आहे की येडियुरप्पा असतील तरच पक्ष सुरक्षित राहील, नाहीतर भाजपला ६० जागा मिळतील, आणि आता ते खरे ठरले आहे, असे जारकीहोळी म्हणाले.
बेळगाव महापालिकेतील घडामोडींसंदर्भातील प्रश्नावर बोलताना, आम्ही कोणतेही ऑपरेशन हात करण्याच्या विचारात नाही, मनपात भाजपची सत्ता आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहून पाठिंबा देऊ. मनपात समस्या नाही असे नाही समस्या आहेतच असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.
आमच्यासमोर लोकसभा निवडणुकीचे टार्गेट आहे. आधी निवडणूक लढवू, त्यानंतर अध्यक्षपदाबाबत चर्चा करू. प्रदेशाध्यक्ष होण्याची माझी कोणतीही इच्छा किंवा मागणी नाही. तशी संधी आल्यावर बघू, आपण डीके शिवकुमार यांचे पॅच अप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्या, माझ्या दरम्यान काहीही झालेले नाही. ते माझ्या घरी अनेकवेळा येतात. तसेच डीके सुरेशदेखील खासदार विकासकामांसाठी मी भेटायला आले होते. त्याचा वेगळा अर्थ काढणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.