बेळगाव लाईव्ह :रोटरी परिवार बेळगाव यांच्यातर्फे साधू वासवानी मिशन पुणे आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 3 डिसेंबर 2023 रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ वेणू ग्राम बेळगावचे उपक्रम अध्यक्ष रो. मल्लिकार्जुन मुरगडे यांनी दिली.
शहरातील महिला विद्यालय शाळेच्या सभागृहात आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. रो. मुरगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे भरतेश एज्युकेशन ट्रस्ट, फोर्ट रोड, बेळगाव येथे येत्या 3 डिसेंबर रोजी सकाळी 8:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजन केले जाणार आहे.
रोटरी अनेक वर्षापासून समाजातील गरजू आणि वंचित लोकांच्या उन्नतीसाठी काम करत आहे. रोटरीने घेतलेल्या 37 वर्षाच्या परिश्रमामुळे 2014 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त राष्ट्र म्हणून घोषित केले आहे. रोटरी परिवारतर्फे येत्या रविवारी आयोजित शिबिरात साधू वासवानी मिशनचे डॉक्टर आणि तज्ञांचे पथक लाभार्थींच्या सदोष अवयवांचे मोजमाप घेतील
आणि त्यानंतर सुमारे 4 ते 5 आठवड्यानंतर लाभार्थीना कृत्रिम अवयव बसवण्यासाठी पुन्हा एकदा बोलावून घेतले जाणार आहे. साधू वासवानी मिशन ही संस्था टेलर मेड कृत्रिम अवयव मोफत पुरवते.
बेळगावमध्ये रविवारी आयोजित केल्या जाणाऱ्या मोफत कृत्रिम अवयव शिबिर या उपक्रमाचा एकूण खर्च जवळपास 20 लाख रुपये इतका आहे.
तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव, रोटरी क्लब ऑफ बेळगाव, रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथ, रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ, रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण, रोटरी ई क्लब ऑफ बेळगाव, इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव, रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईट, दिव्यांगांसाठीचे जिल्हा कार्यालय बेळगाव, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, असोसिएशन ऑफ फिजिकली हॅंडीकॅप शहापूर,
मारवाडी युवा मंच शहापूर, राजस्थानी युवक सेवा मंडळ आणि भरते एज्युकेशन ट्रस्ट यांनी पुढाकार घेतला आहे, असल्याची माहिती रो. मल्लिकार्जुन मुरगडे यांनी दिली. पत्रकार परिषदेस रो. कविता कणगण्णी, रो. डी. बी. पाटील यांच्यासह रोटरीचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.