बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे येत्या 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला येणाऱ्या राजकारणी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तथापी बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी जर्मन तंबूंच्या (टेन्ट) माध्यमातून टाऊनशिप अर्थात वसाहतीची निर्मिती करण्यात आली आहे.
अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांच्या वास्तव्यासाठी निर्माण केलेली जर्मन टेन्ट्सची टाउनशिप कशी आहे? त्या ठिकाणी कोणत्या व्यवस्था आहेत? याची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे आहे. बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी 5000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा यांनी दिली आहे.
इतक्या मोठ्या संख्येने राज्याच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था 4 अतिविशाल जर्मन तंबूंद्वारे निर्माण केलेल्या टाऊनशिपमध्ये केली जाणार आहे. सुवर्ण विधानसौध जवळील अलारवाड समीप खुल्या माळावर निर्माण केलेल्या या टाउनशिपसाठी 2 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
सदर टाऊनशिप उभारणीचे काम म्हैसूर येथील कंत्राटदार के. एम. शरीफ यांनी केले असून 100 कामगारांनी सलग 23 दिवस या टाऊनशिपच्या उभारणीसाठी परिश्रम घेतले आहेत. टाऊनशिपचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून शेवटचा हात फिरवणे बाकी आहे.
सदर टाऊनशिपमध्ये 4 अतिविशाल जर्मन तंबूसह लहान तंबू देखील असणार आहेत. प्रत्येक विशाल जर्मन तंबू (टेन्ट) 100 फूट रुंद आणि 200 फूट लांबीचा आहे. अधिकारीवर्गासाठी या ठिकाणी लहान -लहान तंबूंची निर्मिती करण्यात आली आहे.
एका जर्मन तंबूमध्ये 500 कर्मचाऱ्यांची झोपण्याची सोय होऊ शकते. या पद्धतीने या वॉटरप्रूफ तंबूंमध्ये एकूण 2000 पोलीस कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय होणार असून त्यांना कोट, गादी, उशा आणि बेडशीट पुरवले जाणार आहेत. याखेरीज मोबाईल चार्जिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.