बेळगाव लाईव्ह:जगज्योती बसवेश्वर सर्कल (गोवावेस) येथील खाऊ कट्ट्याची चौकशी सुरू झाल्यामुळे नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या दुकान गाळ्यांचे करण्याद्वारे शासकीय मालमत्तेचा गैरवापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खास पथकाने चौकशी सुरू केल्यामुळे सरकारी मालमत्ता गिळंकृत करणाऱ्यांचे पितळ उघडे पडणार असून हिंदुत्वाच्या नावाखाली सरकारी मालमत्ता लुटणारे चोर आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपन्नावर यांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपण्णावर यांनी खाऊ कट्टा चौकशी संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, गोवावेस येथे नाल्यालगत अनेक गाळ्याचा खाऊ कट्टा बांधून न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली आहे. येथील दुकान गाळ्यांचे वाटप भाजपच्याच कार्यकर्त्यांना करण्यात आले असून त्यांनी ती दुकाने दुसऱ्यांना चालवायला दिली आहेत असे स्पष्ट करून या दुकानांचे भाडे वसूल करणारे कोण? दुकान कोणाला दिले आहे? प्रत्यक्षात दुकान कोण चालवत आहेत? याची चौकशी जेंव्हा तपास पथकाने सुरू केली. तेंव्हा दुकानातील क्यूआर कोड कोणी गायब केले? हे बेळगावच्या जनतेला माहीत आहे, अशी टोपण्णावर यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीवर अप्रत्यक्ष टीका केली.
अधिकारी जेंव्हा चौकशीसाठी येतील. तेंव्हा खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधील क्यूआर कोड वरून दुकाने कोणासाठी मंजूर झाली आहेत आणि आता दुकाने कोण चालवत हे समजू शकते. यासाठीच क्यूआर कोड गायब करण्यात आले. जय किसान मार्केटच्या उभारणीला विरोध करणारे आता जय किसान मार्केटची वकिली करू लागले आहेत. हास्यास्पद हिंदुत्वाच्या नावाखाली सरकारी मालमत्तेचा गैरवापर करण्याद्वारे स्वत: नफा कमावणारे लोकांना धोरणात्मक धडे देत असून हे हास्यास्पद असल्याचे टोपण्णावर यांनी नमूद केले आहे.
हिंदुत्वाच्या मतांवर विजयी होणाऱ्या आमदारांनी खाऊ कट्ट्याला राणी चन्न भैरादेवी यांचे नांव देण्याऐवजी आपल्या जिल्ह्यात अनेक हिंदुत्ववादी आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यापैकी एकाचे नांव का दिले नाही? याचा विचार होणे आवश्यक आहे. खाऊ कट्टा येथे त्या आमदारांनी किती लोकांना हिंदू, दलित, विधवा, गोरगरिबांना स्टॉल दिले आहेत? असा सवाल टोपण्णावर यांनी केला आहे.
सरकारी मालमत्तेचा गैरवापर करणाऱ्या आणि हिंदू धर्माच्या नावाखाली स्वतःचा नफा कमावणाऱ्या नेत्यांनी लोकांना हिंदू धर्म शिकू नये. घोटाळा झाकण्यासाठी हिंदुत्वाचा मंत्र जपणाऱ्यांचे पितळ खाऊ कट्ट्याच्या चौकशीनंतर समोर येईल, असा विश्वास राजीव टोपण्णावर यांनी व्यक्त केला आहे.
Good keep it up ..