Saturday, July 13, 2024

/

बेळगावच्या चित्रकाराला फसविणारा अटकेत

 belgaum

बेळगाव लाईव्ह :पर्यटन मंत्रालयाचा महासंचालक असल्याची बतावणी करून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलेल्या तोतया अधिकारी अनिरुध्द होशिंग याला नागपूर पोलिसांनी लखनौ येथून अटक केली असून प्रसिध्द चित्रकार विकास पाटणेकर यांना अयोध्या येथील श्री राम मंदिराचे चित्रांचे काम देतो म्हणून फसवणूक केली आहे.

यवतमाळ आणि नागपूर येथील अनेक उद्योजकांना आपण पर्यटन मंत्रालयाचा अधिकारी असल्याचे भासवून गुंतवणूक करा म्हणून मोठ्या रक्कमा उकळल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

नागपूर येथील सुनील कुहिकर यांना आपली फसवणूक झाल्याचा संशय आल्यावर त्यांनी नागपूर पोलिसात तक्रार दिली.नंतर हे प्रकरण उघडकीस आले.

अयोध्येतील श्री राम मंदिरासाठी चित्रे काढायची आहेत आणि त्याचे काम तुम्हाला मिळवून देतो असे होषिंग याने विकास पाटणेकर यांना सांगितले होते.कामाबाबत अनेक वेळा चर्चा करणेसाठी होशींग याने विकास पाटणेकर यांना नागपूर,अयोध्या,वाराणसी येथे मीटिंगला बोलवले होते.होषींग यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन विकास पाटणेकर यांनी चित्रांचे प्राथमिक काम देखील सुरू केले होते.

नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अनिरुध्द होशिग याला लखनौ येथून अटक केल्यावर त्याचे कारनामे उघड झाले आहेत. पाटणेकर यांच्याकडून चित्रे काढून घेऊन त्यांचीही फसवणूक करण्याची होषिग याची योजना होती पण सुनील कुहीकर यांनी संशय आल्याने पोलिसात तक्रार दिली आणि विकास पाटणेकर फसवणूक होण्यापासून वाचले.
अनिरुध्द होशिंग याने मुंबईच्या ताज महाल हॉटेल मध्ये एक बैठक होणार आहे असेही सांगितले होते.

या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मान्यवर नेते मंडळी,अभिनेते आणि सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत असे सांगितले होते.त्याचे निमंत्रण पत्रिका देखील त्याने तयार केली होती.ऐन वेळी त्याने ही बैठक रद्द झाल्याचे कळवले.पोलीस तपासात आणखी अधिक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.