बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील महाद्वार रोड येथील यश हॉस्पिटलवर बेळगावचे उपविभागीय अधिकारी व आरोग्य विभागाने संयुक्त छापा टाकून स्त्री भ्रूण परीक्षणाचा प्रकार उधळून लावला आहे. याप्रकरणी वापरले जाणारे रुग्ण नोंदणी पुस्तक, गरोदर महिलांचे स्कॅनिंग रिपोर्ट खात्याने ताब्यात घेतले असून हॉस्पिटलला नोटीस बजावण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अनधिकृत कायदा सुरु होता त्या त्या ठिकाणी सील ठोकण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
बेळगावचे उपविभागीय अधिकारी, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून गर्भधारणापूर्व व प्रसवोत्तर लिंग निर्धारण कायद्याचे उल्लंघन करून अवैधरित्या स्त्री भ्रूण तपासणी करणाऱ्या यश हॉस्पिटलवर छापा टाकला.
कारवाई दरम्यान स्त्रीभ्रूण आढळून आले. रुग्ण नोंदणी पुस्तक, गरोदर महिलांचे स्कॅनिंग, शासनाच्या अनेक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली असून, अल्ट्रासाऊंड स्कॅनिंग मशीन आणि स्कॅनिंग रूम जप्त करण्यात आली आहे.
नोटीसमध्ये रुग्णालयाला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठवडाभरात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. बेळगाव एसी श्रावणकुमार, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. विश्वनाथ एम. भोवी यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.
मातेच्या उदरात असलेल्या भ्रूणाची जन्म होण्यापूर्वी ओळख पटविणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र हा प्रकार या हॉस्पिटलमध्ये राजरोसपणे सुरु होता अशी माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.