Sunday, January 5, 2025

/

विजयेंद्र आणि आर. अशोक यांच्या प्रमोशनवर नाराज उत्तर कर्नाटकातील नेते

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष :आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने लोकप्रिय नसलेल्या दोन नेत्यांची पक्षाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याबद्दल अनेक प्रमुख नेत्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून ज्यामध्ये प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्या गटाला विरोध करणाऱ्या नेत्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

विजापूरचे आमदार असलेले बसनगौडा पाटील -यत्नाळ, गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, अरविंद बेल्लद आणि इतर अनेकांनी यापूर्वीच येडीयुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना पक्षाध्यक्ष आणि आर. अशोक यांना विरोधी पक्ष नेतेपदी बढती दिल्याबद्दल खुलेआम नाराजी व्यक्त केली आहे. सूत्रांच्या मते हा निर्णय साहजिकच भाजपचे वरिष्ठ नेते बी. एल. संतोष तसेच संतोष व रा. स्व. संघाला मानणाऱ्या सर्व आमदारांसाठी निराशाजनक ठरला आहे. लिंगायतांवर मजबूत पकड असलेल्या आणि येडीयुरप्पा मुख्यमंत्री असेपर्यंत गेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये ठामपणे त्यांच्या मागे उभ्या राहिलेल्या उत्तर कर्नाटकातील विविध घटकांनी देखील अशोक आणि विजयेंद्र यांची उच्च पदावर नियुक्ती करण्याच्या कृतीला विरोध दर्शवला आहे.

यासंदर्भात पंचमसाली मठाचे प.पू. जयमृत्युंजय स्वामीजी यांनी राज्यातील पक्षाची दोन्ही उच्च पद बेंगलोर आणि शिमोगा येथील नेत्यांना घेऊन भाजपने उत्तर कर्नाटकातील आपल्या नेत्यांवर अन्याय केला आहे, असे म्हंटले आहे. बसनगौडा पाटील यांच्यासारख्या नेत्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल भाजपवर जोरदार टीका करताना स्वामीजींनी त्या दोन पदांपैकी एक पद तरी उत्तर कर्नाटकला द्यावयास हवे होते, असे मत व्यक्त केले आहे. अशोक आणि विजयेंद्र यांच्या उच्चपदी झालेल्या नियुक्तीला विरोध दर्शविताना गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी गेल्या शुक्रवारच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता.

त्यांनी पक्ष निरीक्षकांची भेट घेऊन बी. एस. येडीयुरप्पा यांना पक्षाचे प्रमुख म्हणून मी एक वेळ स्वीकारले असते मात्र त्यांच्या पुत्राला नाही असे सांगितले. तसेच माझ्यापेक्षा लहान असलेल्या विजयेंद्र यांच्या हाताखाली मी कसे काम करणार? त्या उच्च पदासाठी पक्षाने खरंतर ज्येष्ठ नेत्यांचा विचार करावयास हवा होता, असेही स्पष्ट केले.Politics bjp

भारतीय जनता पक्ष एका घराण्याचा पक्ष झाला आहे, हे पक्षातील हिंदू कार्यकर्ते कदापी खपवून घेणार नाहीत, असे परखड मत फायरब्रँड म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते बसनगौडा पाटील -यत्नाळ यांनी विधिमंडळ पक्षाची बैठकीतून बाहेर पडल्यानंतर व्यक्त केले. उत्तर कर्नाटकातील लोक नेहमीच भाजपला संपूर्ण पाठिंबा देऊन मतदान करत असतात.

मात्र पक्षातील चांगली पद मात्र नेहमीच दक्षिण कर्नाटकातील नेत्यांना दिली जातात, असे दोन्ही पदासाठी इच्छुक असलेले यत्नाळ म्हणाले. मी मौन पाळावे आणि माझी किंमत सांगावी, यासाठी कांही एजंट माझ्याकडे आले होते. त्यावेळी मी कोणत्याही दबावाला अथवा ब्लॅकमेलिंगच्या डावपेचांना घाबरत नसल्याचे त्यांना ठणकावून सांगितले होते, अशी माहितीही विभिन्न व्यासपीठावरून येडीयुराप्पा यांच्या विरोधात खुलेआम बोलणाऱ्या यत्नाळ यांनी दिली. दरम्यान, अशोक आणि विजयेंद्र यांच्या उच्च पदावरील नियुक्तीच्या माध्यमातून येडीयुरप्पा गट पक्षाची सूत्रे आपल्या हातात घेऊ पाहतोय असे भाजपामधील आमदारांना वाटते. गेल्या विधानसभा निवडणुकीत बी. एल. संतोष यांच्या नेतृत्वाखाली दारुण अपयशाचा सामना करावा लागल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत गमावलेले आपले स्थान पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी भाजप समोर येडीयुरप्पा पुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय उरला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.