बेळगाव लाईव्ह :भरधाव टाटा एस वाहन समोर जाणाऱ्या होंडा एक्टिवा दुचाकीला धडकून भररस्त्यात पलटी झाल्यामुळे हजारो लिटर दूध वाया जाण्याबरोबरच दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी शहरातील मिलिटरी महादेव मंदिराजवळ काँग्रेस रोडवर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस रोडवर आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शहराकडून दूध घेऊन पहिला रेल्वे गेटकडे निघालेल्या टाटा एस वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
त्यामुळे नियंत्रण सुटलेला भरधाव टाटा एस समोर जात असलेल्या होंडा एक्टिवाला धडकला. मिलिटरी महादेव मंदिराजवळ घडलेल्या सदर अपघातात एक्टिवावरील महिला व चार वर्षाचा मुलगा रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले.
त्यांची नावे तात्काळ समजू शकली नाहीत. अपघातानंतर पलटी झालेला टाटा एस रस्त्यामध्येच पडून असल्यामुळे कांही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
भररस्त्यात टाटा एस वाहन पलटी होण्याबरोबरच रस्त्यावर हजारो लिटर दूध वाहून मातीमोल होत असल्यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. बेळगाव दक्षिण रहदारी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत सदर अपघात घडला.