बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या येत्या डिसेंबरमध्ये बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित मराठी भाषिकांचा महामेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज बुधवारी 11 सदस्यीय आयोजन समितीची स्थापना करण्यात आली.
कर्नाटक सरकारच्या बेळगावातील येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी आज बुधवारी दुपारी मराठा मंदिर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती सभासदांची बैठक पार पडली. बैठकीच्या प्रारंभी रणजीत चव्हाण पाटील यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर महामेळाव्याच्या आयोजना संदर्भात सर्वांगाने चर्चा करण्यात आली.
चर्चेअंती महामेळावा यशस्वी करण्यासाठी आयोजन समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे या समितीमधील 11 सदस्यांची निवड देखील करण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर गोपाळराव देसाई आदींनी आपापली मते मांडली. बैठकीस मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर म्हणाले की, कर्नाटक सरकारच्या बेळगावमध्ये सुवर्ण विधानसभेचे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शवून निषेध नोंदवण्यासाठी दरवेळी प्रमाणे यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. हा मेळावा कशा पद्धतीने आयोजित केला जावा या संदर्भात चर्चा विचारविनिमय करण्यासाठी आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांची बैठक झाली. बैठकीअंती कर्नाटक सरकार दरवेळी या महामेळाव्याला परवानगी देण्यास टाळाटाळ करत असते. तेंव्हा या संदर्भात नेमके काय करता येईल? हे ठरविण्यासाठी समिती कार्यकर्त्यांची एक समिती नेमावी.
तसेच या समितीमार्फत महामेळावा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण कार्यक्रम आखला जावा. योग्य ती कार्यवाही केली जावी, असे बैठकीत ठरले. त्यानुसार बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि खानापूर तालुका येथील कार्यकर्त्यांची एक समिती नेमण्यात आली आहे. सदर समितीमध्ये बेळगाव तालुका समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस एम. जी. पाटील, राजाभाऊ पाटील, बेळगाव म. ए. समितीतर्फे रणजीत चव्हाण -पाटील, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, पी. ओ. येतोजी तसेच खानापूर समिती मधून गोपाळराव देसाई, गोपाळराव पाटील, मुरलीधर पाटील आणि निरंजन सरदेसाई यांची निवड करण्यात आली आहे. ही समिती महामेळाव्यासंदर्भात नेमकं काय करावं? यावर चर्चा करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करेल. एकंदर यावेळचा महामेळावा यशस्वी करून कर्नाटक सरकारला या ठिकाणच्या मराठी भाषिकांचा जो विरोध आहे तो दर्शविण्याच्या कामी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज करण्यात आली आहे.
महामेळाव्याची जागा, तारीख, वेळ आणि स्वरूप ठरविण्यासाठी नियुक्त केलेली 11 जणांची समिती कार्य करेल. यासंदर्भात लवकरात लवकर स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन माहिती देण्यात येईल. महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने माझी समस्त मराठी जनतेला आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की सर्वांनी जागरूक राहून समितीला पाठिंबा द्यावा. त्याचप्रमाणे ही बाब महाराष्ट्र सरकारच्या नजरेस आणून देण्यासाठी जे कांही करता येईल ते करण्यास आम्ही प्रयत्नशील राहू असे विचार कार्यकर्त्यांनी आजच्या बैठकीत मांडले आहेत.
विशेष करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना याबाबत अवगत करावं अशी आग्रहाची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. तिचा निश्चितपणे विचार केला जाईल आणि मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात येईल, असे अष्टेकर यांनी शेवटी स्पष्ट केले.