बेळगाव लाईव्ह :इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे इयत्ता सातवी, आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट पॉल्स हायस्कूल येथे आयोजित भव्य मॅथ्स अर्थात गणित पंडित स्पर्धेचे सर्वसाधारण अजिंक्यपद राष्ट्रीय मिलिटरी स्कूल शाळेने हस्तगत केले आहे.
इनर व्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे सलग दोन दिवस आयोजित भव्य गणित पंडित स्पर्धेची काल रविवारी सायंकाळी यशस्वी सांगता झाली. सदर स्पर्धेत शहर परिसरातील विविध 29 माध्यमिक शाळांमधील 1093 विद्यार्थी -विद्यार्थिनींनी भाग घेतला होता.
या सर्वांची गेल्या शनिवारी दुपारी 2 वाजता सेंटपॉल्स शाळेत स्पर्धेच्या प्राथमिक फेरी दाखल लेखी परीक्षा घेण्यात आली. या लेखी स्पर्धेद्वारे गणित पंडित स्पर्धेसाठी एकूण 40 मुला -मुलींची निवड करण्यात आली. त्यानंतर काल रविवारी सकाळी 9:00 पासून स्पर्धेची उपांत्य फेरी आणि अंतिम फेऱ्या पार पडल्या. उपांत्य फेरी फास्टेस्ट फिंगरची होती. त्याद्वारे अंतिम लढतीसाठी 10 जणांची निवड करण्यात आली.
थेट प्रश्न, जॉमेट्रीकल कन्स्ट्रक्शन राऊंड, टँग्राम राऊंड आणि चॅलेंज राऊंड अशा चार फेऱ्यांमध्ये झालेल्या अंतिम लढतीत राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या (आरएमएस) विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम कामगिरी नोंदवत गणित पंडित स्पर्धेचे सर्वसाधारण अजिंक्यपद पटकाविले.
सदर स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांची नावे गटवार पुढील प्रमाणे आहेत. इयत्ता सातवी : 1) कंवर प्रताप (आरएमएस), 2) रवी रंजन (आरएमएस), 3) निधी बन्सल (केएलएस पब्लिक), उत्तेजनार्थ -ईशान देसाई (केएलई). इयत्ता आठवी : 1) कनिष्क वैश्य (जैन), 2) प्रथमेश कश्यप (आरएमएस), 3) दिगंत जैन (केएलई), उत्तेजनार्थ -स्वस्तिक धर्मट्टी (केएलई). इयत्ता नववी : 1) ज्ञानेश (आरएमएस), 2) कृषीव कामत (केएलई), 3) तपस्या पुजार (केएलई), उत्तेजनार्थ -विराज कामत (केएलई), लतिका व्ही. एस. (केएलई). इयत्ता दहावी : 1) स्वप्निल पाटील (हेरवाडकर), 2) अनुष राज (आरएमएस), 3) नमन मेहता (केएलई) उत्तेजनार्थ -अनिशा पाटील (केएलई) . सर्वसाधारण अजिंक्यपद : राष्ट्रीय मिलिटरी स्कूल (आरएमएस).
सदर स्पर्धेसाठी टाईम कीपर म्हणून अपर्णा भटकळ यांनी, तर स्कोर कीपर म्हणून सुषमा शेट्टी आणि सुरेखा हेरेकर यांनी काम पाहिले. त्याचप्रमाणे क्विझ मास्टर्स म्हणून नेहा पंडित, शालिनी चौगुले व कीर्ती चिंचणीकर यांनी काम पाहिले.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या अध्यक्षा मंजिरी पाटील व सेक्रेटरी उर्मी शेरेगार यांच्या नेतृत्वाखाली इव्हेंट चेअरमन बेला शिवलकर, को-चेअरमन शिल्पा मनोज, स्पर्धेच्या निमंत्रक पुष्पा देशपांडे, शिल्पा शाह योगिनी नाईक यांच्यासह क्लबच्या इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.