बेळगाव लाईव्ह :कोल्हापूर येथून सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची वाहने त्यांच्या निवासस्थानापर्यंत नेण्याची परवानगी दिली जावी या प्रमुख मागणीसह विविध सुविधांची मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेतर्फे बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष युवराज मोळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व सदस्यांनी उपरोक्त मागण्यांचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी बेळगाव जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील यांना सादर केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची यात्रा यावर्षी येत्या 23 ते 26 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये साजरी होणार आहे. यासाठी कोल्हापूर (महाराष्ट्र राज्य) येथील हजारो भाविक कंत्राटी एसटी बस, खाजगी वाहने, वैयक्तिक वाहने, परिवहन बस आदींद्वारे सौंदत्ती येथे येत असतात.
यात्रा कालावधीत त्यांच्यासाठी कृपया पुढील सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यात्रेसाठी वाहने घेऊन येणाऱ्या भाविकांमध्ये महिला, वयोवृद्ध नागरिक, जेवण -नाश्त्याचे साहित्य, राहण्यासाठी तंबू वगैरे मोठ्या प्रमाणात साहित्य असते त्यामुळे संबंधित वाहनांना त्यांच्या निवासस्थानापर्यंत जाण्याची परवानगी दिली जावी.
खास व सर्वसामान्य देवदर्शनासाठीचे दर कमी केले जावेत. नेहमीचे पार्किंग आणि प्रवेश कराचा दर माफक असावा. प्रवेश आणि पार्किंगचा दर दर्शवणारे फलक इंग्रजीमध्ये मोठ्या अक्षरात असावेत. डाॅमेट्री आणि देवस्थान भक्त निवासातील खोल्या स्वच्छ आणि सुस्थितीत असाव्यात. यात्रा कालावधीत पाणी व वीज पुरवठा निरंतर केला जावा. मंदिर आवारात पूजेचे लाईव्ह टेलिकास्ट स्क्रीन्स लावले जावेत. मंदिर आणि निवासाचा परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच औषध फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण केलेला असावा.
यात्रेसाठी येणाऱ्यांमध्ये महिला भाविकांची संख्या मोठी असते. तेंव्हा यात्रेच्या ठिकाणी महिला पोलीस कॉन्स्टेबल, महिला सुरक्षा रक्षक तैनात केले जावेत. यात्रा काळात दारू आणि मांस विक्रीवर कडक बंदी घालण्यात यावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
निवेदन सादर करतेवेळी अध्यक्ष युवराज मोळे यांच्यासह तानाजी चव्हाण, गजानन विभूते, सतीश दावने, सुभाष जाधव, अच्युत साळोखे, मोहन साळोखे, आनंदराव पाटील, केशव माने, सुशांत पाटील, सरदार जाधव चेतन पवार, धनाजी घबाडे, शालिनी सरनाईक, लता सोमवंशी आदी उपस्थित होते.