बेळगाव लाईव्ह :पूर्ववैमनस्यातून नगरसेवक अभिजीत जवळकर (वय ४५) यांना मारहाण झाल्याची घटना गुरुवारी (दि. २३) दुपारी तीनच्या सुमारास भाग्यनगर नवव्या क्रॉसवर घडली. त्यानंतर हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीसाठी नगरसेवकांनी टिळकवाडी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले. त्यामुळे, पोलिसांनी तातडीने हल्लेखोर रमेश पाटील (रा. भाग्यनगर नववा क्रॉस) यांना ताब्यात घेतले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, जखमी नगरसेवक जवळकर व संशयित पाटील यांची घरे आजूबाजूला आहे. पाटील यांनी आपल्या
अपार्टमेंटवर मोबाईल टॉवर उभारण्यासाठी प्रयत्न चालविले होते. मात्र, त्याला जवळकर यांच्यासह
जखमी अभिजीत जवळकर काहींनी विरोध चालविला होता.
त्यामुळे, गेल्या सहा महिन्यांपासून वादावादी सुरु होती. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा याच कारणावरून दोघांमध्ये वाद उफाळून आला. त्यावेळी पाटील यांनी जवळकर यांना मारहाण केली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच
महापालिकेतील इतर नगरसेवकांनी हल्लेखोराला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी टिळकवाडी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
खडेबाजारचे सहायक पोलिस आयुक्त अरुणकुमार कोळ्ळूर, निरीक्षक परशराम पुजारी यांनी आंदोलकर्त्याची समजूत काढली. या मारामारीत पाटीलही जखमी झाले असून त्यांनीही रुग्णालयात उपचार घेतले. याप्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत टिळकवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. रमेश पाटील यांच्या विरोधात आय पी सी 506,394,307,504,147,143 ,148 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे