बेळगाव लाईव्ह:कर्नाटकाच्या चिक्कबल्लापुर जिल्ह्यातील तालकायलाबेट्टा गावातून गोळा केलेल्या डासांमध्ये झिका विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटक आरोग्य विभागाने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आणि उपाय वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (NIV) राज्य युनिटच्या रिपोर्टनुसार, आरोग्य विभागाने माहिती दिली की डिब्बुरहल्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (पीएचसी) कार्यक्षेत्रातील गावातून गोळा केलेल्या डासांच्या नमुन्यांमध्ये झिका व्हायरस असल्याचे आढळून आले.
“डोळे लाल होणे, डोकेदुखी, पुरळ उठणे, स्नायू दुखणे आणि दोन ते सात दिवस टिकणारी सांधेदुखी ही लक्षणे असलेल्या तापाच्या रुग्णांचे सीरम नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवले जाऊ शकतात. पॉझिटिव्ह केस असलेल्या कुटुंबातील सदस्यांचे सीरम नमुने पुष्टीकरणासाठी एनआयव्हीकडे सादर केले जावे,” असे राज्य आरोग्य खात्याचे आयुक्त रणदीप डी यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे.
Zika व्हायरस रोग (ZVD) मुळे नवजात मुलांमध्ये मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात विसंगती निर्माण होतात असे म्हटले जात असल्याने, झिका विषाणूसाठी पॉझिटिव्ह असलेल्या भागातील सर्व गर्भवती महिलांचे सीरम आणि लघवीचे नमुने गोळा करून NIV कडे पाठवावेत. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
आरोग्य आयुक्तांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, काही जन्मजात विसंगती निर्माण झाल्या आहेत का हे शोधण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी इस्पितळांमध्ये गेल्या तीन महिन्यांत झालेल्या प्रसूतीचा तपशीलही जमविला जाणार आहे.