Sunday, May 5, 2024

/

बेळगावच्या मराठा समाजाच्या लढ्यात सहभागी होऊ : मनोज जरांगे पाटील

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव सह सीमा लढ्यात आणि शेतकरी जमीन संपादन विरोधी लढ्यास मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील बळ देणार आहेत.शुक्रवारी सकल मराठा समाज आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने संभाजी नगर येथे घे जरांगे पाटील यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. रिंग रोड जमीन संपादन, हलगा मच्छे बायपास यासह सीमा प्रश्नावर सविस्तर चर्चा केली त्यावेळी जरांगे पाटील यांनी निपाणी बेळगावचा भेट घेऊ असे आश्वासन दिले.महाराष्ट्र एकीकरण समितीचे रणजित चव्हाण पाटील सकल मराठा समाजाचे नेते रमाकांत कोंडस्कर यांच्यासह महादेव पाटील सागर पाटील विकास कलघटगी,कपिल भोसले,अमित जाधव, आनंद पाटील आदी उपस्थित होते.

सीमाप्रश्नासह सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याया विरोधातील चळवळीत आपण सहभागी होऊ आणि मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन महाराष्ट्रातील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी आज दिली.

मराठा आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. जरांगे -पाटील यांच्या भेटीप्रसंगी नेमकी काय चर्चा झाली? हे छत्रपती संभाजीनगर येथे बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कोंडुसकर बोलत होते. शेतकऱ्यांच्या नेमक्या कोणत्या समस्या आपण जरांगे पाटील यांच्यासमोर मांडल्या? या प्रश्नाला उत्तर देताना समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, हालगा -मच्छे बायपास रस्त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांची जवळपास 850 एकर सुपीक जमीन संपादित केली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव शहराच्या रिंग रोड प्रकल्पासाठी 1273 एकर पिकाऊ जमीन संपादित करण्यात आली आहे. याखेरीज बेळगावच्या आसपासची मराठी बहूबल्य शेतकरी असणारी 28 गावांचा बुडा व्याप्तीत समावेश करण्यात आला आहे. याची, तसेच बेळगाव भागातील शेतकरी, मराठी जनता व मराठी भाषेवर होत असलेल्या अन्यायाची माहिती आम्ही जरांगे -पाटील यांना दिली. त्यावर निपाणी येथे आगामी सभेला आपण उपस्थित राहण्याद्वारे मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधातील चळवळीत आपण सहभागी होऊ आणि मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती कोंडुसकर यांनी दिली.

 belgaum

समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील यांनी मराठा युद्ध मनोज जरांगे -पाटील यांच्या भेटीप्रसंगी आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच सीमा प्रश्नाचा आणि सीमा भागातील शेतकऱ्यांचा मुद्दा देखील उचलून धरावा अशी त्यांना विनंती केली आहे. ही विनंती त्यांनी तात्काळ मान्य करून त्या संदर्भात नजिकच्या काळात बेळगाव शहर किंवा निपाणी येथे एक मोठी जाहीर सभा घेण्याचे आश्वासन जरांगे पाटील यांनी दिले आहे असे सांगितले.Jarange

महाराष्ट्र एकीकरण समिती किंवा सीमा लढ्याबद्दल जरांगे -पाटील यांना कल्पना आहे का? तुम्ही त्यांना त्याबद्दल काय माहिती दिली? या प्रश्नावर समिती नेते रणजीत चव्हाण -पाटील म्हणाले की, 1956 पासून भाषावार प्रांतरचनेत मुंबई प्रांतात असलेल्या बेळगावसह सीमा भागातील मराठी बांधवांना अन्यायाने म्हैसूर प्रांतात डांबण्यात आले. तेंव्हापासून केंद्र सरकारच्या निषेधार्थ आम्ही 1 नोव्हेंबर हा ‘काळा दिन’ म्हणून पाळत आलो आहोत. सीमाभागातील मराठी भाषिकांची चारी बाजूने गळचेपी करणे कर्नाटक सरकारला का शक्य होते, याला कारण महाराष्ट्र सरकार आहे. बघ्याची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्राने जर ठरवलं तर आमचा सीमाप्रश्न सोडवणे ही मोठी बाब नाही. मात्र तेथील नेत्यांना स्वतःच्या खुर्च्या आणि बाकीचे राजकारण महत्त्वाचं वाटत असल्यामुळे ते आम्हाला वेळ देऊ शकत नाही आहेत असे सांगून यासाठीच आम्ही मनोज जरांगे -पाटील यांना विनंती केली की, आता तुमच्याशिवाय सीमावासीयांना पर्याय नाही आहे. सीमावासिय तुमच्याकडे आशेने पहात असून तुम्हीच आम्हाला महाराष्ट्रात घेऊन जालं, अशी अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केल्याचे चव्हाण -पाटील यांनी सांगितले.

सीमाभागातील मराठा आरक्षणाचा, जमिनीचा किंवा सीमाप्रश्नाचा मुद्दा असो युवक म्हणून आपण जरंगे -पाटलांकडे कोणती मागणी केलीत? या प्रश्नावर ….. यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्रातील आंदोलनामुळे सीमा भागातील युवकांना एक नवी स्फूर्ती मिळाली आहे. आज त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून आम्ही आमच्या समवेत एक मोठी प्रेरणा घेऊन जात आहोत जी आम्हाला सीमा लढ्यासाठी, मराठी भाषिकांवरील अन्यायाविरुद्धच्या आंदोलनासाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडणार आहे असे स्पष्ट केले. एकंदर महाराष्ट्र एकीकरण समिती व सकल मराठा समाजाने आज घेतलेल्या भेटी प्रसंगी जरांगे -पाटील यांनी बेळगावच्या मराठा समाजाच्या आंदोलनात आपण निश्चितपणे सहभागी होऊ, असे आश्वासन दिले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.