बेळगाव लाईव्ह :पूर्वीपासूनच बेळगाव आणि हुबळी यांचे नाते मित्रत्वापेक्षा प्रतिस्पर्ध्यासारखेच राहिले आहे. बेळगाव घडणाऱ्या चांगल्या गोष्टींना आत्तापर्यंत हुबळीकर नेहमीच विरोध करत आले आहेत. नुकताच वंदे भारत रेल्वेचा विस्तार हुबळी -धारवाडहून बेळगावपर्यंत करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे यालाही आता हुबळी मधून विरोध होऊ लागला आहे.
मागे वळून पाहता यापूर्वी विमानतळाच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडला होता. बेळगावच्या विमान सेवा हुबळीला पळविण्यात आल्याचे आरोप अनेकदा झाले आहेत नवी दिल्ली विमान सेवा असो किंवा उडान योजनेअंतर्गत हवाई मार्ग असो याबाबतीत भाजपच्या मंत्र्यांनी हुबळीला झुकते माप दिल्याचे आरोप केले गेले होते. त्यानंतर आता बेळगावपर्यंतच्या वंदे भारत रेल्वेच्या बाबतीत आक्षेप घेतला जाऊ लागल्यामुळे बेळगावचे चांगले झालेले हुबळीवासियांना पहावत नाही का? असा खोचक सवाल सध्या नेटकरी मंडळींकडून सोशल मीडियावर केला जात आहे. वंदे भारत रेल्वेचा निर्णय जाहीर करून अवघे दोन दिवस झाले नाहीत तोवर वंदे भारतच्या बेळगावपर्यंतच्या विस्ताराला हुबळी मधून विरोध व्यक्त केला जात आहे. वास्तविक पाहता बेळगाव हे उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा अशा तीन राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे या ठिकाणच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीचा फायदा स्थानिकांसह सर्वांनाच मोठ्या प्रमाणात होणार असून विकासाला अधिक चालना मिळणार आहे. ही वस्तुस्थिती असताना हुबळीतील लोकांकडून वंदे भारत रेल्वेच्या विस्तारास होत असलेल्या विरोधाबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पूर्वीच्या वेळापत्रकानुसार सायंकाळी 7:45 वाजता बेंगलोरला पोहोचणारी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नव्या वेळापत्रकानुसार रात्री 10:10 वाजता बेंगलोरला पोहोचणार असून ते गैरसोयीचे ठरणार आहे, असे हुबळी -धारवाड येथील प्रवाशांचे मत आहे. पूर्वी सायंकाळी 7:45 वाजता बेंगलोरला पोहोचल्यानंतर पुढील 2 -3 तासात आपली महत्त्वाची कामे आटपून त्याच रात्री दुसऱ्या रेल्वेने अथवा बसने माघारी हुबळी -धारवाडला परतणे शक्य होत होते. ते जमले नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी वंदे भारत रेल्वेने परत येता येत होते. मात्र आता ही रेल्वे रात्री 10:10 वाजता बेंगलोरला पोहोचणार असल्यामुळे महत्त्वाची कामे होणार नाहीत. त्यामुळे त्या रात्री बेंगलोर मध्येच वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी सकाळी महत्त्वाची कामे उरकून दुपारी किंवा सायंकाळी रेल्वे वा बसने प्रवाशांना हुबळी -धारवाडला परतावे लागणार आहे. त्यामुळे वेळे बरोबरच पैशाचाही अपव्यय होणार असल्याचे मत हुबळी -धारवाडच्या प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे.
रेल्वे खात्याने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सकाळी 5:45 वाजता बेंगलोर येथून प्रस्थान करून सकाळी 10:50 वाजता हुबळीच्या श्री सिद्धारूढ स्वामीजी रेल्वे स्थानकावर, त्यानंतर 11 20 वाजता धारवाड रेल्वे स्थानकावर पोहोचेल. धारवाड येथून सकाळी 11:25 वाजता सुटून ही रेल्वे दुपारी 1:30 वाजता बेळगावला पोहोचणार आहे. यापूर्वी ही रेल्वे धारवाड येथून 1:15 वाजता, तर हुबळी येथून 1:40 वाजता प्रस्थान करून सायंकाळी 7:45 वाजता बेंगलोरला पोहोचत होती. आता यापुढे ही रेल्वे बेळगाव येथून दुपारी 2 वाजता सुटून सायंकाळी 4:15 वाजता धारवाड आणि 4:45 वाजता हुबळी येथे थांबा घेऊन रात्री 10:10 वाजता बेंगलोर येथे पोहोचणार असल्याचे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या वेळापत्रकात नमूद आहे.
या संदर्भात रेल्वे सल्लागार समिती हुबळीचे सदस्य महेंद्र सिंगी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा विस्तार बेळगावपर्यंत वाढविणे हुबळी -धारवाडच्या प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचे ठरणार नाही. बेळगावपर्यंतच्या विस्तारामुळे या रेल्वेचा उद्देश सफल होणार नाही. त्यामुळे बेळगावसाठी वेगळी वंदे भारत रेल्वे सोडल्यास बरे होईल, असे म्हंटले आहे.
आपल्या या प्रतिक्रियाद्वारे सिंगी यांनी बेळगावपर्यंतच्या वंदे भारत रेल्वेच्या विस्तारास अप्रत्यक्षरीत्या आक्षेप घेतला आहे. दरम्यान नैऋत्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिश हेगडे यांनी बेंगलोर -धारवाड वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे बेळगावपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. या रेल्वेचे वेळापत्रकही जाहीर आली असून या वेळापत्रकाच्या अंमलबजावणीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.