बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील प्रमुख स्मशानभूमीपैकी एक असलेल्या सदाशिवनगर स्मशान भूमीतील अंत्यसंस्काराच्या जागेवरील शेडचे अत्यंत खराब झालेले धोकादायक पत्रे तात्काळ बदलावेत अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा प्रभाग क्र. 14 चे नगरसेवक शिवाजी पुंडलिक मंडोळकर यांनी महापौरांना दिला आहे.
नगरसेवक शिवाजी पुंडलिक मंडोळकर यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी महापौर शोभा सोमनाचे यांना सादर केले.
महापौरांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. सदाशिवनगर स्मशान भूमीतील अंत्यसंस्काराच्या कठड्यावर बांधण्यात आलेल्या शेडच्या छताचे सर्व गॅल्वनाईज पत्रे खराब झाले असून त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
कांही पत्रे फाटून खाली कोसळण्याच्या अवस्थेत लोंबकळत आहेत. सोसाट्याचा वारा आला तर सदर पत्रे खाली कोसळण्याची शक्यता आहे या शेडमध्ये दररोज 7 ते 8 शवांवर अंत्यविधी होत असतात.
त्यावेळी शेड खाली जमलेल्या असंख्य लोकांच्या डोक्यावर हे पत्रे अथवा छताचे गंजलेले लोखंडी अँगल्स कोसळून दुर्घटना घडू शकते.
तरी याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत हा विषय विषय पत्रिकेवर घेऊन त्या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, असा तपशील महापौरांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
सदाशिवनगर स्मशान भूमीतील शेडचे पत्रे व लोखंडी अँगल्स येत्या 8 दिवसात बदलण्याची व्यवस्था करावी. अन्यथा स्मशानभूमीत आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.