बेळगाव लाईव्ह:कॅण्टोन्मेंट बोर्ड कर्मचारी भरती प्रकरणी गेल्या पाच दिवसांपासून सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. सुरवातीला अधिकारी व भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी झाली. गुरुवारी (दि. २४) याबाबत तक्रार करणारे कॅण्टोन्मेंट बोर्डचे सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांच्याकडेही चौकशी करण्यात आली. त्यामुळे, आणखी किती दिवस चौकशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०२१ मध्ये झालेल्या कर्मचारी भरती प्रकरणी सदस्य तुपेकर यांच्याकडून तक्रार झाल्याने सीबीआयचे पथक शनिवारपासून (दि.१८) कॅण्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात ठाण मांडून आहे. गेल्या पाच दिवसात भरती प्रक्रियेतील सहभागी अधिकारी, मुलाखत घेणारे अधिकारी, पेपर तपासणारे कर्मचारी, परीक्षेवेळी पर्यवेक्षक म्हणून सेवा बजावलेले शिक्षक, भरती झालेले कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांची कसून चौकशी करण्यात आली. गुरुवारी तक्रारदारतुपेकर यांच्याकडे बंद खोलीत चौकशी करण्यात आली.
कॅण्टोन्मेंट बोर्ड नोकर भरती प्रकरणी अधिकारी, कर्मचारी, तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सीबीआयचे पथक तपास करत आहे. चौकशीवेळी संबंधित कर्मचाऱ्यांना अचानक पाचारण केले जात आहे. त्यातच २०२१ पूर्वी भरती झालेला एक
व नव्याने भरती झालेले दोन अशा एकूण तीन कर्मचाऱ्यांना कामावरुन डच्चू दिल्याची माहिती उघड झाल्याने अन्य कर्मचारी व अधिकारीही धास्तावले आहेत.
चौकशी सुरूच
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तक्रारदार व सरकारनियुक्त सदस्य तुपेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सध्या सीबीआयची चौकशी सुरु आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच याबद्दल माहिती दिली जाईल, असे सांगितले.