बेळगाव लाईव्ह:1 नोव्हेंबर काळ्या दिनी सायकल फेरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत कर्नाटक सरकारच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 18 पदाधिकाऱ्यांच्या विरोधात मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईचा सीमा भागात निषेध केला जात असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
भाषावार प्रांत रचनेवेळी बेळगावसह सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आल्याबद्दल केंद्र सरकारच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गेल्या बुधवारी 1 नोव्हेंबर रोजी लोकशाहीच्या मार्गाने काळा दिन पाळून निषेधात्मक सायकल फेरी काढण्यात आली होती. काळ्या दिनासाठी व्यापक जनजागृती करण्यात आल्यामुळे या सायकल फेरीला प्रचंड प्रतिसाद लाभला होता. धर्मवीर संभाजी उद्यान येथून सुरू झालेले ही सायकल फेरी प्रमुख मार्गावरून फिरून रेल्वे ओव्हर ब्रिज नजीकच्या मराठा मंदिर येथे समाप्त झाली होती.
मराठा मंदिर येथे जाहीर सभा घेण्यात आली होती. सायकल फेरी दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या घोषणांव्दारे कर्नाटकच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच महाराष्ट्राच्या बाजूने घोषणा देऊन सामाजिक सलोख्याचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
बेकायदा जमाव जमाविणे, दोन भाषिकात तेढ निर्माण करणे आदी कलमाखाली मराठी नेते व कार्यकर्ते अशा 18 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या खेरीज सायकल फेरीत सहभागी झालेल्या हजारो मराठी बांधवांमधील जवळपास 1000 हून अधिक जणांवर ‘अज्ञात’ म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नावासह गुन्हा नोंद झालेल्या 18 जणांमध्ये माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी उपमहापौर शिवाजी सुंठकर, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, प्रकाश मरगाळे, सारिता पाटील, रणजीत चव्हाण -पाटील, विकास कलघटगी, गजानन पाटील, आर. एम. चौगुले, नेताजी जाधव, ॲड. अमर येळूरकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, गजानन पाटील आदींचा समावेश आहे. मार्केट पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिली असून भादवि 143, 153 ए, 290, 149 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटक राज्योत्सव दिनी शोभा मिरवणुकीच्या नावाखाली धुडगूस घालून शहराला वेठीस धरणाऱ्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून लोकशाहीच्या मार्गाने लढा देणाऱ्या समिती नेते व कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्याच्या बेळगाव पोलिसांच्या या कृतीचा सीमाभागात धिक्कार केला जात असून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.