बेळगाव लाईव्ह :कॅन्टोन्मेंट बोर्डातील बेकायदा कर्मचारी भरती प्रक्रिया, अवैध बांधकाम तसेच जमिनीच्या अतिक्रमणांसंदर्भात स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय तपास यंत्रणेकडून (सीबीआय) बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयावर छापा टाकून चौकशी केली जात आहे. तक्रारींसंदर्भात सीबीआयने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद आणि इतर कर्मचाऱ्यांना जाब विचारला आहे.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कारभाराची चौकशी नवी दिल्ली आणि बेंगलोर येथील सीबीआय अधिकाऱ्यांकडून संयुक्तरीत्या केली जात आहे. वर्षभरापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डात विविध जागांची भरती करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बोर्डाचे नामनिर्देश सदस्य सुधीर तुपेकर यांनी केला होता.
त्यासंदर्भात सीबीआय पथकाकडून काल मंगळवारी सलग सहाव्या दिवशी चौकशी सुरूच होती. सीबीआय अधिकाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट मधील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याबरोबरच कागदपत्रांची तपासणी केली. कॅन्टोन्मेंट बोर्डातील कर्मचारी भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याच्या तक्रारीनंतर सीबीआयचे अधिकारी गेल्या गुरुवारपासून कॅन्टोन्मेंटचे अधिकाऱ्यांची चौकशी करत आहेत. मंगळवारीही त्यांनी बोर्डाच्या सभागृहात अधिकाऱ्यांची चौकशी व कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या तपासणीत वर्षभरापूर्वी विविध सरकारी कागदपत्रांशी छेडछाड झाली असल्याचे निदर्शनास आल्याचे समजते.
त्याचप्रमाणे सीबीआयच्या पथकातील बहुतांश अधिकारी बेंगळूर येथील असल्याचे कळते. त्यांनी गेल्या रविवारी 19 नोव्हेंबर रोजी सुट्टीच्या दिवशी देखील कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांकडे चौकशी केली होती.
दरम्यान सलग सहाव्या दिवशी चौकशी सुरू असल्याने कॅन्टोन्मेंट हद्दीत उलट सुलट चर्चेला ऊत आला आहे. तथापि यासंदर्भात कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांनी मात्र अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.