Saturday, December 28, 2024

/

नूतन प्रदेशाध्यक्षामुळे बदलणार का बेळगाव भाजपचे समीकरण?

 belgaum

बेळगाव लाईव्ह: कर्नाटक प्रदेश भाजपा अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचे सुपुत्र विजेयेंद्र यांची नियुक्ती केल्याचा आदेश भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्यानंतर कर्नाटकातील भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा एकदा वेगळ्या समीकरणाला सुरुवात झाल्याच्या चर्चाला राजकीय वर्तुळात उधान आले आहे.

मुळात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा हे भाजपाचे मास लीडर किंवा जनसामान्यात वेगळी प्रतिमा असलेला नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या चिरंजीवांच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीमुळे आगामी कांही दिवसात भाजपला बळकटी मिळेल असे मतही राजकीय जाणकारातून व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपकडून विरोधी पक्ष नेता सुद्धा नेमण्यात आला नव्हता. त्यामुळे कर्नाटकात भाजप बॅक फुटवर आहे की काय? असे वातावरण होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या अवघे 6 महिने अगोदर भाजपा हाय कमांडने येडीयुरप्पा यांच्या मुलाच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ घातल्याने अप्रत्यक्षरीत्या राज्यातील भाजपची सूत्रे येडीयुरप्पा यांच्या हातात दिल्यासारखे मानले जात आहे.

विजेंद्र यांच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्तीनंतर बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार? हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. बेळगावच्या लोकसभा जागेसाठी विद्यमान खासदार मंगला यांचे तिकीट कापले जाणार की काय? या चर्चेला देखील उधान आले आहे. कारण खासदार मंगला अंगडी यांचे नातलग माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये गेले आहेत. तेंव्हापासूनच मंगला अंगडी यांचे आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचे तिकीट कापले जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. माजी रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांनी एकेकाळी सलग चार वेळा बेळगावची लोकसभेची जागा निवडून आणली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अर्धांगिनी मंगला अंगडी खासदार झाल्या. तथापि या वेळच्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मंगला अंगडी यांनाच मिळणार की अन्य दुसऱ्या कोणाला मिळणार? याची चर्चा देखील सध्या जोर धरू लागली आहे.Vijayendra

विजेंद्र यांच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीनंतर बेळगाव जिल्ह्यात जे कोण लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्या सर्वांमध्ये शंकरगौडा पाटील यांचे पारडे सध्याच्या घडीला जड मानले जात आहे. शंकरगौडा पाटील हे बी. एस. येडीयुरप्पा यांच्या विश्वासू लोकांपैकी एक मानले जातात. येडीयुरप्पा ज्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी शंकरगौडा पाटील यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली होती. वन विकास औद्योगिक महामंडळाचे अध्यक्ष, दिल्लीतील कर्नाटकाचे लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आदी पदे शंकरगौडा पाटील यांनी भूषविली आहेत. पाटील हे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या लॉबीतील जवळचे घटकही मानले जातात. यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी भाजपकडून शंकरगौडा पाटील यांचे पारडे जड मानले जात आहे. शंकरगौडा पाटील व्यतिरिक्त केएलईचे संचालक आणि माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवडीमठ यांचे नांव देखील भाजप उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. त्यांच्या मागोमाग विद्यमान राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. या पद्धतीने एकंदर लिंगायत समाजातील हे तीन मोठे चेहरे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. याव्यतिरिक्त मराठा समाजाकडून माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांचे नांवही चर्चेत असले तरी भाजप हाय कमांड मराठा समाजाला उमेदवारी देणार का? हा चर्चेचा मुद्दा आहे.Deewali 1

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विजेंद्र यांच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीनंतर शंकरगौडा पाटील यांचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे. मात्र आता बेळगाव महानगर भाजपा अध्यक्ष कोणाला बनवायचे? हा प्रश्न असला तरी हे पद लिंगायत समाजाच्या एखाद्या व्यक्तीला दिले जाऊ शकते.Deewali 1

माजी आमदार ॲड. बेनके यांना मागील वर्षी हंगामी महानगर अध्यक्ष बनविण्यात आले होते. मात्र आता हे अध्यक्ष पद लिंगायत समाजाला दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच विजेंद्र यांच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीनंतर कर्नाटकातील भाजपचे सत्ता समीकरण बदलण्यास सुरुवात झाली असून पुन्हा एकदा राज्यातील भाजपाची सर्व सूत्रे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या हातीच जातात की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे.Deewali 1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.