Saturday, November 9, 2024

/

गुलमोहर बागच्या ‘व्हाय नॉट रेड’ प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहरातील गुलमोहर बाग आर्टिस्ट ग्रुपतर्फे आयोजित लाल रंगाशी निगडित ‘व्हाय नॉट रेड’ या पाच दिवसांच्या कला प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ शहरातील वरेकर नाट्य संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये नुकताच उत्साहात पार पडला.

सदर उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आयआयडब्ल्यूसी आर्ट गॅलरी बेंगलोरचे क्युरेटर चित्रकार संजय चापोलकर, जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्टचे माजी प्राचार्य चित्रकार जे. बी. फडके आणि आर्ट अफेयर्सचे संस्थापक चित्रकार विश्वनाथ गुग्गरी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करून शिरीष देशपांडे यांनी प्रास्ताविकात गुलमोहर बाग आर्टिस्ट ग्रुपच्या उपक्रमांची माहिती दिली.

त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात चापोलकर यांनी प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या प्रत्येक पेंटिंगची अद्वितीयता आणि सौंदर्याबाबत उत्कंटतेने विचार मांडले. तसेच या कला प्रदर्शनाचा आपणही एक भाग झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

गुग्गरी यांनी कलेचे महत्त्व विशद करताना कला ही सीमेपलीकडे जाणारी वैश्विक भाषा असल्यामुळे कलाकारांनी जगप्रवासाला घाबरू नये असे सांगून आपले समयोचित विचार व्यक्त केले.Gulmohar bagh

कलाप्रेमी मंडळी आणि नागरिकांसाठी सलग पाच दिवस खुल्या असणाऱ्या व्हाय नॉट रेड या प्रदर्शनात गुलमोहर बागच्या 46 प्रतिभावंत चित्रकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. या सर्व कलाकृतींमधून गुलमोहरच्या कलाकारांनी लाल रंगाच्या विविध छटांमधून सृर्जनशीलता आणि अभिव्यक्तीच्या ताकदीचे दर्शन घडविले आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास गुलमोहर बाग आर्टिस्ट ग्रुपच्या पदाधिकारी व सदस्यांसह निमंत्रित, हितचिंतक आणि बहुसंख्य कलाप्रेमी उपस्थित होते.

काल उद्घाटनानंतर दुपारी 4 वाजता संजय चापोलकर यांनी आपल्या कलेचे श्वास रोखून धरावयास लावणारे अप्रतिम प्रात्यक्षिक सादर केले. ‘व्हाय नॉट रेड’ हे प्रदर्शन येत्या दि. 5 ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असून कलाप्रेमींसह शहरवासीयांनी या प्रदर्शनाचा बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन गुलमोहर बाग आर्टिस्ट ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.