बेळगाव लाईव्ह:बेळगाव ते पंढरपूर बंद करण्यात आलेली रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत म्हणजे दिवसातून दोन वेळा सुरू करण्यात यावी, अशी मागणी बेळगाव शहर व तालुक्यासह आसपासच्या भागातील वारकरी समुदायाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
वैष्णव सदन आश्रम येळ्ळूर -धामणे ते पंढरपूर पायी दिंडीचे अध्यक्ष बाळू शंकर केरवाडकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीची निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
आपल्या मागणी संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना बाळू केरवाडकर म्हणाले की, बेळगाव ते पंढरपूर बंद असलेली रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही बेळगाव शहर व तालुक्यासह बैलहोंगल, सौंदत्ती, चंदगड तालुका आणि खानापूर तालुक्यातील सर्व वारकरी आज येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जमलो आहोत.
रेल्वे मार्ग दुरुस्तीच्या कारणास्तव गेल्या तीन-चार वर्षांपासून बेळगाव ते पंढरपूर रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव परिसरातील भक्त आणि वारकरी मंडळींची मोठी गैरसोय होऊन त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तेंव्हा पूर्वी बेळगावहून पंढरपूर साठी दुपारी 2:30 वाजता आणि त्यानंतर 4 वाजता अशा दोन रेल्वे होत्या त्या रेल्वे आता पुन्हा पूर्ववत सुरू करून आम्हा सर्वांना दिलासा द्यावा अशी आमची मागणी आहे असे बाळू शंकर केरवाडकर यांनी सांगितले.
याप्रसंगी कुमाणा कोमाणाचे, मारुती सांबरेकर, सिद्राय मादकाचे, विष्णू बाळेकुंद्री, परशराम अकनोजी, रामा लोकनूचे, कलाप्पा पाटील, दत्ताजी मेलगे, मनोहर मेलगे, महादेव पाटील, अण्णाप्पा येळ्ळूरकर, नंदू पाटील, वसंत डुकरे, मारुती शिवानाचे आदी बरीच वारकरी मंडळी उपस्थित होती.
बेळगाव पंढरपूर रेल्वे साठी बेळगावचे खासदार मंगला अंगडी आणि राज्यसभा सदस्यांना इरान्ना कडाडी हे लक्ष देतील का हा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे.