बेळगाव लाईव्ह :वडगाव येथील पशु चिकित्सालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्याबरोबरच रात्रीच्या वेळी या चिकित्सालयाचे आवार ‘दारूचा अड्डा’ बनत आहे.
त्याकडेही पशुवैद्यकीय खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी पशुपालकांसह सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केली आहे.
वडगाव परिसरातील शेतकरी व अन्य पशुपालकांच्या सोयीसाठी जुन्या काळातील चावडीच्या ठिकाणी फार पूर्वीपासून पशु चिकित्सालयाची सोय करण्यात आली आहे. मात्र अलीकडच्या काळात या चिकित्सालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानीपणा सुरू असल्याचा आरोप आहे.
कारण हे चिकित्सालय नेमून दिलेल्या ठराविक वेळेत सुरू राहण्याऐवजी केंव्हाही सुरू आणि केंव्हाही बंद होत असते. काहीशा एकांतात असलेल्या या पशु चिकित्सालयाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी गैरप्रकार देखील चालत आहेत. सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी आज मंगळवारी काही कामानिमित्त या पशूचिकित्सालयाकडे गेले असता. हे चिकित्सालय दुपारी 3 वाजताच बंद ठेवण्यात आले होते.
याव्यतिरिक्त चिकित्सालयाच्या आवारात सर्वत्र अस्वच्छता निर्माण होण्याबरोबरच मागील बाजूस व दोन्ही बाजूला दारूची पाकिटे आणि बिअरच्या बाटल्या इतस्ततः पडलेल्या पहावयास मिळत होत्या. त्यावरून सायंकाळनंतर रात्रीच्या वेळी या पशु चिकित्सालयाचे आवार म्हणजे मद्यपींसाठी दारू पिण्यासाठी सोयीची जागा ‘दारूचा अड्डा’ बनल्याचे स्पष्ट होत आहे.
तेंव्हा अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी व मद्यपिंचा वावर याची वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच या प्रकारांना आळा घालण्यासाठी वडगाव पशु चिकित्सालयातील अधिकारी,
कर्मचाऱ्यांसाठी हजेरी निरीक्षण प्रणाली त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासारखी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केली आहे.
https://x.com/belgaumlive/status/1714295975274271224?s=20