बेळगाव लाईव्ह : हिंडलग्यासह बंगळूर मधील परप्पन अग्रहार कारागृह उडवून देण्याची धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यात बंगळूर पोलिसांना यश आले आहे. किरण मोशी (वय ४८) असे त्याचे नाव असून तो मूळचा बेळगाव हुक्केरीचा आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
संशयित मोशी हा २०२२ मध्ये हिंडलगा कारागृहात होता. दुसऱ्याचे अकांउंट हॅक करुन त्यावरुन अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्यावर सायबर क्राईम विभागाने कारवाई केली होती.
त्यातून तो कारागृहात काही दिवस शिक्षा भोगत होता. आता त्याने सरकारी अधिकाऱ्यांचे क्रमांक मिळवून पत्नीच्या नावे असणाऱ्या सीम कार्डचा वापर करत धमकीचा फोन केल्याचे चौकशीत आढळून आले आहे.
हिंडलगा व परप्पन कारागृह स्फोटकांचा वापर करुन उडवून देण्याची धमकी त्याने उत्तर विभागाचे डीआयजीपी टी. पी. शेष यांच्या सरकारी मोबाईलवर दिली होती. या प्रकरणी वडगाव पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.
त्यामुळे, संशयिताला ताब्यात घेण्यासाठी बेळगाव ग्रामीण उपनिरीक्षक लक्कप्पा जोडट्टी व त्यांचे सहकारी मंगळवारी बंगळूरला रवाना झाले आहेत.