बेळगाव लाईव्ह:कोणत्याही धर्माच्या बाबतीत अशोभनीय निंदा करणारे अपमानास्पद वक्तव्य करून त्या धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावणे हा कायदेशीर गुन्हा आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पोलीस आयुक्तालयामध्ये सोशल मीडिया मॉनिटरिंग यंत्रणा बसविण्यात आली असल्याची माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी दिली.
पोलीस आयुक्तालयामध्ये आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा म्हणाले की, कर्नाटक राज्यातील सोशल मीडिया इव्हेंट मॉनिटरिंगसाठी म्हणजे समाज माध्यमांवरील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पोलीस आयुक्तालयामध्ये सोशल मीडिया मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
त्यामुळे फेसबुक, ट्विटर इंस्टाग्राम वगैरेंवर युवक, सार्वजनिक नागरिक, कोणताही मोठा नेता, धार्मिक गुरु असो किंवा सध्याचे सत्ताधारी नेते असोत अशा कोणावर देखील त्यांच्या भावनांना ठेच पोहोचवणारे किंवा त्यांच्या धार्मिक भावना दुखावणारे पोस्टर अथवा वक्तव्य टाकल्यास मॉनिटरींगच्या माध्यमातून आम्हाला ते तात्काळ करणार करणार आहे. तसेच सदर कृत्य करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. भादवि कलम 153 (ए), 295 (ए), आयटीआय ॲक्ट 60 अंतर्गत संबंधितांना अटक करून कारवाई केली जाईल.
आठवडाभरापूर्वीच बेळगावातील खडेबाजार आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अशा दोन घटना घडल्या आहेत. सदर घटना निदर्शनास येताच याप्रकरणी तात्काळ कारवाई करत दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्य अथवा पोस्टर्स टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी.
पोलीस प्रशासनाचे सोशल मीडियावर 24 तास मॉनिटरिंग सुरू असणार आहे. माझे समाजातील सर्व पालक, शिक्षक, धार्मिक गुरु यांना आवाहन आहे की त्यांनी यासंदर्भात दक्षता बाळगावी आणि आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करावे. सोशल मीडियावर कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणारे संदेश अथवा पोस्टर्स व्हायरल करू नयेत. कोणत्याही धर्माच्या लोकांना दुखवू नये. आमचा देश धर्मनिरपेक्ष आहे. हिंदू, मुस्लिम, जैन, शिख, बौद्ध सर्व जाती- धर्माचे लोक आपल्या देशात राहतात.
धर्मनिरपेक्षतेसाठी आपला देश जगप्रसिद्ध आहे आणि ही धर्मनिरपेक्षता अबाधित राखणे अत्यंत गरजेचे आहे ते सांगून सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारे काहींही आढळल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना कळवावे. आम्ही संबंधितांना अटक करून कायदेशीर कारवाई करू, असे आवाहन पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी केले.