बेळगाव लाईव्ह:सध्याच्या कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी राज्यभरातील बांधकाम कामगारांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याची तयारी शासनाने सुरू केली असून सध्या प्रायोगिक तत्वावर राजधानी बेंगलोर आणि बागलकोट जिल्ह्यातील कामगारांना स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येत आहे.
सध्या असणाऱ्या कार्डचा अनेक कामगार दुरुपयोग करत असल्याचे कामगार खात्याच्या निदर्शनास आले आहे. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आपल्या कार्ड वरून योजनांचा अधिक प्रमाणात लाभ घेत आहेत.
त्याचप्रमाणे कुटुंबातील दोन पेक्षा जादा मुलांना शिक्षण व आर्थिक मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्डचा गैरवापर केला जात आहे. अनेक वर्षापासून तपासणी (स्क्रीनिंग) झाले नसल्यामुळे हे प्रकार वाढले आहेत.
सदर गैरप्रकार रोखण्यासाठी यापुढे कामगारांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने बेळगावच्या कामगार खात्याने तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, या स्मार्ट कार्डसाठी सरकारने घातलेल्या विविध अटी व नियम जाचक असल्यामुळे त्यात शिथिलता आणावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेने केली आहे.