बेळगाव लाईव्ह :आम्ही अर्ज करून कित्येक वर्षे झाली मात्र अद्याप आम्हाला घर मिळाला नसल्याचा आरोप करत महिलांनी बेळगाव मनपा समोर आंदोलन केलं.सोमवारी महिलांनी आयुक्त अशोक दुडगुंटी यांना निवेदन दिले.
गेल्या 12 वर्षांपूर्वी आम्ही वाजपेयी निवासी योजनेसाठी कर्ज काढून महापालिकेला पैसे दिले आहेत. पण, अद्याप कोणत्याही प्रकारे घर मिळालेले नाही. त्यामुळे आमची फसगत झाली असून आर्थिक ओढाताण होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर घर देण्यात यावे, अशी मागणी शहापूर येथील महिलांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
आम्ही शहापूर येथील गरीब 300 कुटुंबांनी 2012 मध्ये 50 आणि काही जणांनी 60 हजार रूपये महापालिकेला दिले आहेत. वाजपेयी निवास योजनेतून आम्हाला घरे देण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. त्यावेळी आम्हाला घर मंजुरीचे पत्रही देण्यात आले. पण, गेल्या 12 वर्षांपासून आम्हाला अद्याप कोणत्याही प्रकारचे घर देण्यात आले नाही असेही त्यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या घरा संदर्भात महापालिका अधिकार्यांकडे वारंवार चौकशी केली. पण, त्यांनी नेहमीच टोलवाटोलवी केली आहे. आता आम्हाला आमची फसगत झाल्याची भावना निर्माण झाली आहे अशी भावना त्यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
आमची आर्थिक स्थिती चांगली नसून महापालिकेने तत्काळ घरांची उभारणी करून आम्हाला घरे देण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.यावेळी महापालिका आयुक्त दुडगुंटी यांनी या प्रकाराची चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.