Friday, November 15, 2024

/

जमिनीच्या प्रकरणात निवृत्त शिक्षकाची निर्दोष मुक्तता

 belgaum

बेळगाव लाईव्ह :भावाच्या नावावर असलेली जमीन ‘मीच कसतो’ असे दाखवून खोटी कागदपत्रे तयार करून दुसऱ्या व्यक्तीला सब रजिस्ट्रार खानापूर येथे खरेदीपत्र करून फसवणूक केल्याच्या आरोपातून एका सेवानिवृत्त शिक्षकाची खानापूर येथील मुख्य दिवाणी व जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी साक्षीदारातील विसंगतीमुळे निर्दोष मुक्तता केली आहे.

निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपीचे नांव संभाजी मारुती ओऊळकर (वय 70, रा. गौळवाडी, पो. बसर्गे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) असे असून ओऊळकर हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. खानापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गौळवाडी (ता. चंदगड) येथील फिर्यादी विलास मारुती ओऊळकर यांच्या नावावर खानापूर तालुक्यातील बैलूर गावामध्ये 4 एकर 22 गुंठे जमीन आहे.

सदरी जमीन आरोपी संभाजी यांनी मीच विलास ओऊळकर आहे असे दर्शवून फसवण्याच्या उद्देशाने सदरी जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून मुरलीधर जाधव यांच्याशी आपल्या सख्ख्या भावाच्या नावावर असलेल्या जमिनीचे गेल्या 13-1-2012 रोजी खरेदीपत्र केले.

यासाठी खानापूर सब रजिस्ट्रार कार्यालयामध्ये दोन साक्षीदार उभे करून खरेदी पत्रावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन सरकारी अधिकाऱ्यांसमोर मीच विलास बेळगावकर आहे असे सांगून फोटो काढून घेऊन माहिती असताना सुद्धा खोटी स्वाक्षरी केली. या पद्धतीने फसवेगिरी करून खोटी कागदपत्रे सरकारला हजर करून सदर जमिनीची खरेदीपत्र केल्याचा गुन्हा केला.

याबाबतची माहिती मिळताच फिर्यादी विलास ओऊळकर यांनी आपला भाऊ संभाजी यांच्यावर 11-10-2013 रोजी खानापूर पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी भा.द.वि. कलम 465, 467, 468, 470, 471, 420, 506 अन्वये गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर आरोपीने बेळगाव येथील दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन करून घेत खानापूर पोलिसांसमोर हजेरी लावली.

पुढे पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून आरोपी संभाजी ओऊळकर यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयाच्या सुनावणीत फिर्यादी व इतर साक्षीदारांची पडताळणी केली असता साक्षीदारातील विसंगतीमुळे आरोपी निवृत्त शिक्षक संभाजी मारुती ओऊळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने ॲड. मारुती कामाण्णाचे व ॲड. मारुती कदम यांनी काम पाहिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.