बेळगाव लाईव्ह :बेळगावकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे भारतातील आघाडीची प्रादेशिक एअरलाइन कंपनी स्टार एअर आज रविवारपासून बेळगाव आणि मुंबई दरम्यान दररोजची नॉन स्टॉप अर्थात दैनंदिन विमानसेवा सुरू करत आहे. यासाठी बेळगावच्या हवाई मार्गांवर पहिल्यांदाच आधुनिक एम्ब्रेर ई175 या जेट विमानाचा अवलंब केला जाणार आहे.
स्टार एअरलाईन्स आपल्या आधुनिक 76 आसनी एम्ब्रेर ई175 विमानाच्या माध्यमातून दर सोमवार, शुक्रवार व रविवार, तसेच 50 आसनी एम्ब्रेर ई145 विमानाच्या माध्यमातून मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवारी बेळगाव -मुंबई विमान सेवा सुरू करण्याद्वारे बेळगाव आणि मुंबईला भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीस्कर अशा अखंड प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. स्टार एअरने बेळगाव आणि मुंबई दरम्यान बिझनेस क्लास सेवा उपलब्ध केली आहे.
बेळगावच्या विमान सेवा क्षेत्रात या पद्धतीने पहिल्यांदाच एम्ब्रेर ई175 विमानाचा वापर केला जाणार आहे. हे जेट विमान बेळगाव आणि मुंबई दरम्यानच्या प्रवासाचे अंतर अवघ्या 1 तास 15 मिनिटात कापेल.
एम्ब्रेर ई175 हे आधुनिक प्रादेशिक जेट विमान असून जे इंधन क्षमता, कमी आवाज, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि निष्कलंक सुरक्षा रेकॉर्डसाठी सुप्रसिद्ध आहे. स्टार एअरलाइन्सने सुरू केलेल्या बेळगाव -मुंबई विमान सेवेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.
रविवार, सोमवार आणि शुक्रवार : मुंबई ते बेळगाव -दुपारी 12:15 वाजता प्रस्थान, 1:25 वा. आगमन. बेळगाव ते मुंबई -दुपारी 1:55 वा. प्रस्थान, 3:10 वा. आगमन. मंगळवार बुधवार, गुरुवार व शनिवार : बेळगाव ते मुंबई -सकाळी 8:50 वा. प्रस्थान, सकाळी 9:55 वा. आगमन. मुंबई ते बेळगाव -दुपारी 12:50 वा. प्रस्थान, 1:55 वाजता आगमन.