बेळगाव लाईव्ह :पाणी पुरवठ्यातील अडथळ्यांचे आव्हान हाताळण्यासाठी इतिहासात पहिल्यांदाच रोबोटिक टेक्नॉलॉजीचा अवलंब करत बेळगाव शहराने मैलाचा दगड गाठला आहे.
बेळगाव शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी स्वीकारलेल्या एल अँड टी (लार्सन अँड टुब्रो) कंपनीने पाणी पुरवठ्यातील त्रासदायक अडथळे -समस्या दूर करण्यासाठी हे आधुनिक तंत्रज्ञान अवलंबण्यास सुरुवात केली आहे.
क्रांतिकारक ‘स्मॉल पुश टीथर टेक्नॉलॉजी’ वापरून एल अँड टी कंपनी आता जलवाहिनीतील अडथळे आणि जलवाहिनीला लागलेल गळत्या परिणामकारकरित्या अल्पावधीत शोधून काढत शहरातील कमी दाबाच्या पाण्याची समस्या दूर करत आहे.
यासाठी रोबोटिक कॅमेराचा वापर केला जात असून ज्याद्वारे भूमिगत वॉटर पाईपलाईन अर्थात जलवाहिन्यांची अचूक तपासणी केली जाते. पाईपलाईनमध्ये तैनात स्पेशलाइज्ड कॅमेरा अडथळे आणि पाणी प्रदूषित करणाऱ्या बाबी शोधून काढतो.
हा रोबोटिक कॅमेरा 100 मीटर पर्यंतच्या पल्ल्यात छायाचित्र घेऊन ती पटकन लॅपटॉप स्क्रीनवर प्रक्षेपित करतो. त्यामुळे संबंधित दुरुस्तीसाठी सर्वसमावेशक ब्ल्यू प्रिंट उपलब्ध होते, असे केयुआयडीएफसीचे अधीक्षक अभियंता अशोक अशोक बुरकुले यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
रोबोटिक टेक्नॉलॉजीच्या या नवकल्पनेमुळे पाणी पुरवठ्यातील समस्या दूर करण्यासाठी लागणारा वेळ आणि कामगारांची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे गळती शोधण्यासाठी ठीकठिकाणी केली जाणारी रस्त्याची अनावश्यक खुदाई आणि त्यामुळे जनतेला होणारा त्रास देखील टळणार आहे.
शहरातील 25 ते 30 वर्षे जुन्या जलवाहिन्यांमधील गळतीची अचूक जागा शोधून काढण्यासाठी आणि कमी दाबाच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी हे नवे रोबोटिक तंत्रज्ञान प्रभावी ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणी पुरवठ्याशी संबंधित जलवाहिन्यांमधील सर्व समस्यांचे तात्काळ आणि उत्तम पद्धतीने निवारण होण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.