बेळगाव लाईव्ह: बेळगाव तालुक्यातील निलजी आणि वडगाव भागातील वारकऱ्यांनी बंद पडलेली बेळगाव ते पंढरपूर थेट रेल्वे सेवा सुरू करा अशी मागणी मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
या मागणीची दखल अखेर बेळगावचे राज्यसभा सदस्यांनी घेतली आहे. सोमवारी दिल्ली मुक्कामी राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी यांनी रेल्वे बोर्डाच्या चेअरमन जयवर्मा सिन्हा यांची भेट घेऊन बेळगाव पंढरपूर रेल्वे सेवा बहाल करण्यासह रेल्वे संबंधी अनेक मागण्या केल्या आहेत.
बेळगाव पंढरपूर सह बेळगाव मुंबई आणि बेळगावहून झारखंड येथील शिखरजी या ठिकाणी थेट रेल्वे सेवा सुरू करा अशा मागणीचे निवेदन देखील दिले आहे.
या सह कडाडी हंपी एक्सप्रेस या गाडीचा विस्तार व्हाया धर्मावरम ते प्रशांती निलयम(पुट्टपूर्ती) पर्यंत वाढवा अशीही त्यांनी मागणी केली आहे.
राज्यसभा सदस्य कडाडी यांनी बेळगावशी संबंधित अनेक मागण्या केंद्र शासनाकडे केल्या आहेत त्या पूर्ण करून घेण्यासाठी दिल्ली दरबारी पाठपुरावा आणि वजन वापरण्याची गरज आहे.
तत्कालीन रेल्वे राज्य मंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर त्यांची पोकळी भरून काढण्याचे प्रयत्न कडाडी करताना दिसत आहेत मात्र त्यांना कितपत यश मिळते हे बेळगावच्या दिल्लीत किती मागण्या पूर्ण होतात यावरून ठरणार आहे.
बेळगाव मधून हुबळीला पळवलेल्या केंद्राच्या योजना विशेष करून बंद झालेल्या विमान सेवा पूर्ववत कराव्या त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे.