Friday, May 24, 2024

/

पगारासाठी सफाई कामगारांचा धरणे सत्याग्रह

 belgaum

बेळगाव लाईव्ह :आपला प्रलंबित पगार तात्काळ अदा केला जावा अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, असा इशारा देत महापालिकेच्या सफाई कामगारांनी आज गुरुवार सकाळपासून सदाशिवनगर स्मशानभूमी शेजारील महापालिकेच्या बीट ऑफिससमोर धरणे सत्याग्रह सुरू केला आहे.

महापालिकेच्या 138 सफाई कामगारांच्या पगाराबाबत आयुक्त अशोक दूडगुंटी यांनी नगर प्रशासन खात्याला पत्र पाठविले असले तरी आपला पगार तात्काळ अदा केला जावा यासाठी कांही सफाई कामगारांनी आज सकाळी सदाशिवनगर स्मशानभूमी शेजारील महापालिकेच्या बीट ऑफिसच्या प्रवेशद्वारात ठिय्या मांडून धरणे आंदोलन सुरू केले आहे.

जोपर्यंत आपला पगार मिळत नाही तोपर्यंत आपण जागेवरून हलणार नाही असा इशाराही या कामगारांनी दिला आहे सफाई कामगारांच्या या आंदोलनाची माहिती मिळताच महापालिका आयुक्त अशोक दुडगुंडी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आंदोलन करणाऱ्या सफाई कामगारांची विचारपूस करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तथापि जोपर्यंत प्रलंबित पगार मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सफाई कामगारांनी व्यक्त केला.

 belgaum

यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना एकनाथ अर्जुन कोलकर या सफाई कामगाराने सांगितले की, मी गेल्या नोव्हेंबर 2022 पासून कामावर रुजू झालो आहे. आता या नोव्हेंबरमध्ये मला वर्ष होत आले तरी माझ्या खात्यावर पगार जमा झालेला नाही. आम्ही सर्व 138 सफाई कामगार आमचे काम चोखपणे पार काढत असतानाही आमचा पगार करण्यात आलेला नाही. पगारासाठी आंदोलन करण्याची आमची ही चौथी खेप आहे. मात्र आजतागायत आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिका आयुक्तांपासून हनुमंत कलातगी वगैरे सर्वजण फक्त आश्वासने देत आहेत. आमची काय चूक झाली? आम्ही कोणाला मारहाण केली? की कांही गैरवर्तन केले? आम्ही तर शहर स्वच्छतेचे काम करतो मग आमच्यावर अन्याय का? आम्ही पैसे देऊन ही नोकरी मिळवली असे कांही जण म्हणतात. आमच्याकडे पैसे असते तर आम्ही इथं कामाला कशाला आलो असतो. कंत्राटदार वाय. बी. गोल्लर यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही त्यांच्या बाबतीत ताजे उदाहरण सांगायचे झाल्यास त्यांच्याकडे 45 जण अनधिकृतपणे काम करत आहेत.Ccb

अनाधिकृत म्हणजे ते कामावरच नाहीत, मात्र त्यांच्या नावे दरमहा गोल्लर यांच्या खात्यावर पगाराचे पैसे जमा होतात. प्रत्येकाचा पगार 14,500 रुपये इतका आहे या हिशोबाने गोल्लर यांच्या खात्यावर दरमहा सात लाखाहून अधिक रक्कम काम करत नसलेल्यांच्या नावे जमा होत आहे. तर दुसरीकडे आम्ही काम करून देखील आम्हाला पगार दिला जात नाही आमच्यावर हा अन्याय का? आता आमची सहनशक्ती संपली आहे. यापूर्वी आम्ही अनेक वेळा आदराने, सौजन्याने वागलो आहोत. पगारासाठी हातापाया पडून झाल्या आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नाही आहे. आम्ही सर्वजण गरीब आहोत, कोणीही श्रीमंत नाही.

प्रत्येक जण भाड्याच्या घरात राहतो. मी स्वतः गेल्या चार महिन्यापासून घराचे भाडे देऊ शकलेलो नाही. घरात अन्न नाही. पगार नसल्यामुळे लोकांकडून उसनवारी घेतलेल्या पैशापोटी आमच्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे. ते पैसे आम्हाला कोण देणार? तेंव्हा आता जोपर्यंत आम्हाला आमचा प्रलंबित पगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा निर्धार व्यक्त करून एकनाथ कोलकार याने माझा स्वतःचाच जवळपास दीड लाखाचा पगार प्रलंबित असल्याचे सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.