बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील दुकानं आणि आस्थापनातून जप्त केलेल्या प्लास्टिकची पावडर करून तिचा वापर रस्ता डांबरीकरणामध्ये करण्याचा अभिनव उपक्रम बेळगाव महापालिकेने हाती घेतला आहे.
राज्यात सर्वप्रथम म्हैसूर शहरात प्लास्टिक पावडरचा वापर रस्ते निर्मितीसाठी केला जात असून त्यानंतर आता बेळगाव हा उपक्रम सुरू आहे.
शहरातील रस्ता डांबरीकरणाचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदारांना महापालिकेने डांबरीकरणावेळी अधिक मजबुतीसाठी डांबरा सोबत प्लास्टिक पावडर वापरण्याची अट घातली आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदाराला महापालिकेकडूनच प्लास्टिकचा पुरवठा केला जाणार असून ऑटोनगर येथील कारखान्यात प्लास्टिकपासून पावडर तयार केली जात आहे. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी प्रति 200 मीटर सुमारे 250 ते 300 किलो प्लास्टिक पावडरची गरज भासते. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे प्लास्टिकपासून पावडर तयार करण्यासाठी साधारण प्रति किलो 20 रुपये खर्च येतो. हा खर्च मात्र कंत्राटदाराला करावा लागणार आहे.
कर्नाटकात 2016साली प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारने जुलै 2022 पासून एकल वापर प्लास्टिक बंदी लागू केली. त्या अनुषंगाने बेळगाव शहरात कारवाई सुरू झाली. यंदा देखील जुलै महिन्यात प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्याद्वारे महापालिकेने मोठ्या प्रमाणात एकल प्लास्टिक जप्त केले आहे.
हे प्लास्टिक सिमेंट कंपन्यांना पाठवले जाणार होते, मात्र आता त्या प्लास्टिकची पावडर करून तिचा वापर डांबरी रस्त्याच्या निर्मितीसाठी केला जाईल. या पद्धतीने प्लास्टिकच्या समस्येवर कांही प्रमाणात तोडगा निघाला आहे, असे महापालिकेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी यांनी सांगितले.