बेळगाव लाईव्ह : 1 नोव्हेंबर 1956 साली झालेल्या भाषावार प्रांत रचनेत बेळगावसह सीमाभागात कर्नाटकात सामील करण्यात आला त्यावेळीपासून 1 नोव्हेंबर हा बेळगावातील मराठी भाषिक काळा दिवस म्हणून पाळतात. लोकशाही मार्गाने होणाऱ्या मराठी भाषकांच्या आंदोलनास शेवटच्या क्षणी परवानगी दिली जाते मागील वर्षीही जिल्हा प्रशासनाने काळ्या दिनाला परवानगी देणार नसल्याचे म्हटले होते.
बेळगावात जिल्हा पंचायत सभागृहात गुरुवारी कर्नाटक राज्योत्सव दिन साजरा करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीत बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यावेळी राज्योत्सवादरम्यान काळा दिन साजरा करण्याची संधी देणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, काळा दिवस साजरा होऊ देणार नाही. यावेळी नितेश पाटील यांच्या आदेशाचे कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
कन्नड रक्षण वेदिकेच्या नारायण गौडा गटाचे राज्य समन्वयक महादेव तलवार यांनी महाराष्ट्र शासन सीमेवर कार्यालय सुरू करत आहे. सीमाभागातील कन्नड-मराठी फूट पाडण्याचे काम करत आहे. हे तातडीने शासनाच्या निदर्शनास आणून याला आळा घालावा. काळा दिवस साजरा करण्याची परवानगी देऊ नका, याबाबत करवे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन दिले आहे.
बैठकीच्या सुरुवातीलाच, महाराष्ट्र सरकारने काल मुंबईत महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत घेतलेल्या बैठकीचा विषय नमूद करण्यात आला. महाराष्ट्र सीमाभाग उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी मुंबईत एमईएस सदस्यांसोबत बैठक घेतली. सगळे मराठीत बोलत असल्याने काय चालले आहे ते कळत नाही. पण कर्नाटकच्या नावाचा उल्लेख ऐकायला मिळतो. सीमेवरील मराठी भाषिकांना एकत्र आणण्याबाबत ते बोलत असल्याचे दिसते अशी चर्चा करण्यात आली.
गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा क्रीडांगणावर सकाळी १०.३० वाजता भव्य राज्योत्सवाचे आयोजन केले आहे. जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल. राज्योत्सवात कन्नड लढवय्ये, लेखक, पत्रकार यांचा गौरव करण्यात येणार आहे.
बैठकीत नवीन समित्या स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली, याशिवाय बॅनर, स्टेज गॅलरी पाण्याची व्यवस्था बेळगाव महानगरपालिका करणार आहे. कन्नड समर्थक आणि इतर संघटनांवर महोत्सव आयोजित करण्यासाठी कोणतेही बंधन घालू नये, अशी विनंती केली.