बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो आवारातील जिल्हा आरोग्य खात्याच्या कार्यालयामध्ये तेथील कर्मचाऱ्यांनी गांधी जयंती दिवशीच मद्यपानाची रंगीत पार्टी करून धिंगाणा घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणे यांनी याची गांभीर्याने दखल घेत संबंधितांच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे.
महात्मा गांधी जयंती दिवशी जिल्हा प्रशासनाकडून मद्य आणि मांसमच्छी विक्रीवर बंदी घातली जाते. गांधीजींच्या आचार -विचारांना आदरांजली वाहणे हा त्यामागचा हेतू असतो.
तथापी जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना मात्र बापूजींच्या आचार विचारांचा विसर पडला आणि तोही गेल्या गांधी जयंती दिवशी. आरोग्य खात्याच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी चक्क टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो आवारात असलेल्या आपल्या कार्यालयामध्येच दाराआड दारू ढोसत रंगीत पार्टी केली.
या पार्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
याप्रकरणी रंगीत पार्टीत सहभागी असलेला डीएचओंचा कार चालक मंजुनाथ पाटील, महेश हिरेमठ, सत्यप्पा तमन्नावर, अनिल तिप्पन्नावर, रमेश नायक, कल्लाप्पा मुनवळ्ळी व दीपक गावडे या सात जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, व्हायरल झालेला व्हिडिओ हा पाच -सहा महिन्यापूर्वीचा असून पार्टी करणारे आमचे कर्मचारीच आहेत.
मात्र रंगीत पार्टीचा सदर प्रकार गांधी जयंती दिवशी झाला नाही. पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे, असे डीएचओ अर्थात जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणे यांनी स्पष्ट केले आहे.