बेळगाव लाईव्ह :भारत सरकारच्या ‘अग्निपथ योजने’ अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या संपूर्ण भारतातील दुसऱ्या अग्निवीर तुकडीचा प्रमाणीकरण सोहळा अर्थात दीक्षांत सोहळा आज मंगळवारी सकाळी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे लष्करी पद्धतीने मोठ्या दिमाखात पार पडला.
मराठा सेंटरच्या परेड मैदानावर आयोजित या दीक्षांत सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते. प्रारंभी त्यांनी खुल्या जिपमधून परेडचे परीक्षण केले.
त्यानंतर 31 आठवड्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या 63 अग्निविरांनी पथसंचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. पथसंचलनाचे नेतृत्व अग्निवीर गोयल राम यांनी केले, तर मेजर अभिषेक कश्यप हे परेड ॲडज्युटंट होते. पथसंचलनानंतर अग्निवीरांनी मोठ्या अभिमानाने आपला राष्ट्रीय ध्वज, रेजिमेंटल ध्वज आणि पवित्र धार्मिक ग्रंथांच्या साक्षीने देशसेवेची शपथ घेतली.
प्रमुख पाहुणे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी यावेळी अग्निवीरांना संबोधित करताना, मराठा रेजिमेंटलचा समृद्ध वारसा आणि भारतीय सैन्याच्या सर्वात जुन्या पायदळ रेजिमेंटपैकी एक म्हणून मराठा लाईट इन्फंट्रीच्या वैभवाची आठवण करून दिली.
सैनिकाच्या जीवनातील शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला. तसेच मराठा रेजिमेंटल सेंटरमधील प्रशिक्षणावर विश्वास व्यक्त करत भविष्यातील कामगिरीसाठी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध प्रशिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गुणवंत अग्निवीरांना पदकेही प्रदान करण्यात आली.
नाईक यशवंत घाडगे, सर्वोत्कृष्ट अग्निवीरचे व्हिक्टोरिया क्रॉस पदक अग्निवीर पाटील वैभव शामराव याने पटकावले. शरकत युद्ध स्मारक येथे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी आणि अग्निवीरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले दीक्षांत सोहळ्याचा समारोप झाला. सदर सोहळ्यास वरिष्ठ लष्करी अधिकारी, जवान, निमंत्रित आणि शपथबद्ध झालेल्या अग्निवीरांचे नातलग बहुसंख्येने उपस्थित होते.