Saturday, July 27, 2024

/

बेळगाव -दिल्ली विमानसेवा 5 पासून पुन्हा होणार सुरू

 belgaum

बेळगाव लाईव्ह:उत्तम प्रतिसाद मिळत असताना वर्षभरापासून बंद पडलेली आणि वाढती मागणी असलेली बेळगाव ते नवी दिल्ली विमानसेवा आता येत्या गुरुवार दि. 5 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे बेळगाव ते मुंबई ही विमान सेवा येत्या 15 ऑक्टोबरपासून दररोज कार्यान्वित होणार आहे.

इंडिगो विमान कंपनी बेळगाव ते दिल्ली विमानसेवा सुरू करणार असून या कंपनीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नवी दिल्ली ते बेळगाव विमान प्रवासाचा कालावधी 2 तास 20 मिनिटे असणार आहे तसेच दिल्ली -बेळगाव प्रवासासाठी 5294 रु. आणि बेळगाव ते दिल्लीसाठी 4719 रुपये तिकीट भाडे आकारले जाणार आहे.

गेल्या 15 दिवसांपूर्वीच तिकीट बुकिंगलाही सुरुवात झाली असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या गुरुवारपासून इंडिगोचे विमान दररोज दुपारी 3:45 वाजता नवी दिल्लीहून प्रस्थान करून सायंकाळी 6:05 वाजता बेळगावला पोहोचेल. त्यानंतर बेळगावहून 6:35 वाजता प्रस्थान करून रात्री 9 वाजता दिल्लीला पोहोचेल. स्पाइस जेट कंपनीने 2 वर्षांपूर्वी बेळगाव ते दिल्ली विमान फेरी सुरू केली होती. मात्र चांगला प्रतिसाद मिळत असताना अचानक स्पाइस जेटने तांत्रिक कारण देत ही विमान सेवा बंद केली.

नवी दिल्ली विमानसेवा बंद पडल्यानंतर राजकीय नेते, उद्योजक, अधिकारी व व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. बेळगावमधून दिल्लीची विमान फेरी बंद झाल्याने संबंधित प्रवाशांना एक तर हुबळी अथवा गोवा येथील मोपा विमानतळ गाठावे लागत होते. बेळगाव ते नवी दिल्ली विमान सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी राजकीय नेत्यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.

नवी दिल्लीच्या विमानसेवेबरोबरच येत्या 15 ऑक्टोबरपासून स्टार एअर कंपनीची बेळगाव ते मुंबई ही विमान सेवा दररोज सुरू होणार आहे. स्टार एअरची सध्या मंगळवार, बुधवार, गुरुवार व शनिवार अशी चार दिवस बेळगाव मुंबई विमानसेवा आहे.

मात्र 15 ऑक्टोबरपासून बेळगावातून ही सेवा दररोज नॉन स्टॉप सुरू राहील. या नॉन स्टॉप उड्डानांसाठी स्टार एअर आधुनिक एम्ब्रेर -175 विमान आणि एम्ब्रेर -145 विमानाचा वापर करणार आहे. स्टार एअर बेळगाव ते मुंबई दरम्यान बिझनेस क्लास सेवा देणार आहे. या विभागात एम्ब्रेर -175 चालवण्याची ही पहिलीच वेळ असेल. सध्या बेळगाव विमानतळावरून मुंबई, इंदोर, अहमदाबाद, जयपुर, सुरत, बंगळूर, तिरुपती, हैदराबाद, जोधपुर व कानपूर या शहरांना विमान सेवा सुरू आहे. यात आता दिल्लीची भर पडणार आहे. कांही दिवसात पुण्याची विमान सेवा देखील सुरू केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.