बेळगाव लाईव्ह :गोकाक परिसरात खून, वाटमारी, दरोडे, अपहरण, अत्याचार वगैरे सुमारे 50 गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कुप्रसिद्ध खिलारी गॅंगच्या म्होरक्याला गोकाक पोलिसांनी गजाआड केले आहे. एका महिलेवर सामूहिक अत्याचार केल्या प्रकरणी पोलिसांनी बेनचीनमर्डी (ता. गोकाक) येथील खिलारी गॅंगच्या म्होरक्यासह एकूण 5 जणांना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली आहे.
बेळगाव येथे आपल्या कार्यालयामध्ये काल सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा पोलीस प्रमुखांनी (एसपी) दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अटक केलेल्या खिलारी गॅंगच्या म्होरक्याचे नांव रमेश उदाप्पा खिलारी (रा. बेनचीनमर्डी) असे आहे.
महिलेवरील अत्याचार प्रकरणी रमेश खिलारी याला अटक करण्यासाठी गोकाक पोलीस गेल्या रविवारी त्याचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी त्यांना चकवण्याच्या प्रयत्नात रमेश मोटर सायकल वरून पडल्यामुळे आयता पोलिसांच्या हातात सापडला. एका महिलेने शिक्षक दिनी आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार गोकाक पोलीस ठाण्यात नोंदविली.
मुख्य संशयित रमेश खिलारी याने गेल्या 5 सप्टेंबर रोजी आपणास आदित्यनगर येथील एका घरात नेले. थोड्यावेळाने त्या घरात तो आणि अन्य चार साथीदारांनी चाकूचा धाक दाखवून माझी पर्स, सोन्याच्या रिंगा, एटीएम कार्ड, मोबाईल व 2 हजार रुपये काढून घेतले. तसेच माझ्यावर जंबियाचा धाक दाखवून चार ते पाच जणांनी अत्याचार केला अशी फिर्याद आरोपीने धमकावल्यामुळे त्या महिलेने उशिरा दिली. त्यानुसार गेल्या 29 सप्टेंबर रोजी गोकाक शहर पोलीस ठाण्यात भादवि 341, 342, 384, 376 (डी), 506 सहकलम 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात खिलारी गॅंगने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले असून या टोळीतील बसवराज खिलारी हा फरारी झाला आहे. गोकाक भागात दहशत माजवणाऱ्या खिलारी व एस. पी. सरकार गॅंग मधील सर्व गुन्हेगारांवर प्रत्येकी सहा ते नऊ गुन्हे नोंद आहेत.
कनसगेरी (ता. गोकाक) येथील गुरुनाथ विरूपाक्षी बडीगर हे गेल्या 14 सप्टेंबर रोजी गोकाकून आपल्या घरी जात असताना पाच-सहा जणांच्या टोळक्याने त्यांना अडवून त्यांच्याकडील सोन्याची चेन, अंगठी व रोकड पळविली. याप्रकरणी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी तसेच वाहने व जनावरे चोरल्याच्या आरोपावरून गोकाक पोलिसांनी यापूर्वी गोकाक येथे सरकार व खिलारी टोळीतील दुर्गाप्पा सोमलिंगप्पा वड्डर, यल्लाप्पा सिद्धाप्पा गिसनिंगवगोळ, रामसिद्ध गुरुसिद्धप्पा तपशी व कृष्णा प्रकाश पुजारी अशा चौघाजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडील चोरीच्या 6 मोटरसायकली 9 मोबाईल रोख रक्कम असा सुमारे 8 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हे चौघेही खिलारी गॅंगचे सदस्य असून महिलेवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात त्यांचाही सहभाग आहे. आता खिलारी गॅंगचा म्होरक्या रमेश खिलारी याच्या अटकेमुळे आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या पाच वर पोचली आहे. फरारी बसवराज खिलारी यांचा शोध घेण्याबरोबरच याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.